ऑनलाईन टीम / मुंबई :
पुण्यात रुपाली पाटील यांनी नुकताच मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे माजी आमदार आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी बाळा नांदगावकरही पक्ष सोडणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावरुन व्हायरल झाले होते. त्यावर नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
नांदगावकर म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही जणांकडून जाणिवपूर्वक सोशल मीडियावर पसरवले जात आहे. मी आज मनसेच्या शिवडी गडाच्या कार्यालयाबाहेर उभा राहून सांगतो की, माझी निष्ठा व पक्ष राज ठाकरे यांना अर्पित आहे. त्यामुळे मी पक्षातून कुठेही जाणार नाही. जे मला ओळखतात, त्यांना याबद्दल सांगण्याची गरज नाही.
मी कामासाठी अनेक नेत्यांना भेटतो. तसेच अभिजीत पानसेही भेटले असतील. यात विशेष काही नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील वृत्तांना महत्त्व देऊ नये. माझ्या राजकारणाबद्दल, राज ठाकरेंच्या आणि माझ्या संबंधाबद्दल एक हिंदी गाणे सर्व काही एका कडव्यात सांगून जाते. “तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम” अशा शब्दात नांदगावकर यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.