जी-7 देशांकडून ‘लिब्रा’वर स्थगितीची मागणी : लवकरच निर्णय शक्य : फेसबुकची योजना रखडण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेची समाजमाध्यम कंपनी फेसबुकचे डिजिटल चलन लिब्राच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. जी-7 च्या सदस्य देशांनी या चलनावर बंदी घालण्याची योजना आखल्याचे वृत्त आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. फेसबुकचे जगभरात जून तिमाहीपर्यंत 270 कोटी वापरकर्ते होते.
जी-7 मध्ये जगातील 7 मोठय़ा अर्थव्यवस्था असलेले देश आहेत. यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका सामील आहे. फेसबुकने मागील वर्षी लिब्रा हे डिजिटल चलन सादर करण्याची योजना आखली होती.
नियमनासंबंधी प्रश्नचिन्ह
जी-7 चे मध्यवर्ती बँकर्स आणि अर्थमंत्री लिब्रा या डिजिटल चलनाच्या नियमनासंबंधी प्रश्न उपस्थित करत आहेत. जी-7 चे वित्तीय नियामकही देखील यासंबंधी साशंक आहेत. अशा स्थितीत फेसबुकला हे चलन सादर करणे अवघड ठरत चालले आहे. या चलनाला सद्य स्वरुपात सादर केले जाऊ नये असे जी-7 देशांचे म्हणणे आहे. या देशांकडून प्रसिद्ध दस्तऐवजात ग्लोबल स्टेबल क्वाइन प्रोजेक्ट नावाने यावर टिप्पणी करण्यात आली आहे. स्टेबल क्वाइनचा अर्थ क्रिप्टोकरन्सीशी आहे. काही देशांमध्ये हे बिटक्वाइन या नावानेही ओळखले जाते.
एचएसबीसीचे अधिकारी नियुक्त
फेसबुकने स्वतःच्या या चलनासाठी जगातील दिग्गज बँक हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) च्या तीन वरिष्ठ अधिकाऱयांना नियुक्त केले आहे. यात एचएचबीसीचे युरोपीय प्रमुख जेम्स, माजी मुख्य कायदा अधिकारी स्टुअर्ट यांनी सप्टेंबर महिन्यात फेसबुकमध्ये सेवेस प्रारंभ केला आहे. मागील आठवडय़ातच एचएसबीसीच्या इयान यांना लिब्रामध्ये मुख्य वित्तीय अधिकारीपद देण्यात आहे.
कायदेशीर झाल्यावरच अनुमती
स्टेबल क्वाइन प्रकल्पाला ते कायदेशीर ठरेपर्यंत अनुमती देण्यात येऊ नये असे जी-7 देशांचे म्हणणे आहे. नियामकीय आराखडा तयार होईपर्यंत लिब्राला मंजुरी देण्यात येऊ नये. योग्य नियमनाशिवाय लिब्रा सारखे प्रकल्प वित्तीय स्थैर्य, ग्राहकांची सुरक्षा, खासगीत्व, कररचना आणि सायबर सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात असे जी-7 च्या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.
लिब्राद्वारे ऑनलाईन पेमेंट
अशाप्रकारचे चलन जागतिक वित्तीय व्यवस्थेला उद्ध्वस्त करू शकते का यावरही जी-7 गट विचार करत आहे. अनेक देश डिजिटल चलन सादर करण्याची योजना आखत असताना या घडामोडी घडल्या आहेत. चीनने स्वतःच्या पीपल्स बँक ऑफ चायनाला लवकरात लवकर डिजिटल चलन आणण्यास सांगितले आहे.चीन स्वतःच्या राष्ट्रीय चलनाला डिजिटल फॉर्ममध्ये सादर करणार आहे.
16 देशांमध्ये कारवाईला वेग
मागील आठवडय़ातच अनेक देशांनी याप्रकरणी एक मोठी मोहीम राबविली होती. क्रिप्टोकरन्सीद्वारे मनी लॉन्ड्रिंग करणाऱया 20 जणांना युरोपोलने 16 देशांमधून अटक केली होती. हे आरोपी लाखो युरोंना आंतरराष्ट्रीय बँक खात्यांमधून बनावट कंपन्यांना हस्तांतरित करत होते. हे रक्कम हस्तांतरण पोलंड आणि बुल्गारियामध्ये क्रिप्टोकरन्सीद्वारे करण्यात आले होते. अशाचप्रकारे ब्रिटन, स्पेन, इटली आणि बुल्गारिया या देशांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या मोहिमेला 2बागोल्ड म्यूल नाव देण्यात आले होते. याप्रकरणी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्पेनमध्येही अटकेची कारवाई करण्यात आली होती.









