वृत्तसंस्था/हैदराबाद :
द्वेषपूर्ण भाषणांप्रकरणी वाद वाढल्यावर फेसबुकने तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंग यांच्यावर बंदी घातली आहे. समाजमाध्यमाद्वारे हिंसाचार आणि द्वेष फैलावण्याचा प्रयत्न रोखण्याचे धोरण न मानल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे. भारतात कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या विरोधात करण्यात आलेली अशाप्रकारची ही बहुधा पहिलीच कारवाई आहे.
माझे फेसबुक पेजच नाही, प्रसारमाध्यमांद्वारेच बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एप्रिल 2019 पासूनच फेसबुकचा वापर करत नसल्याचा दावा आमदार राजा सिंग यांनी केला आहे.
इन्स्टाग्रामवरही बंदी
आमच्या धोरणाच्या विरोधात जाणाऱया वापरकर्त्यांच्या चौकशीची कक्षा खूपच मोठी आहे. याच कारणामुळे आमदाराच्या विरोधात आम्ही कारवाई केली आहे. राजा यांच्यावर फेसबुकसह इन्स्टाग्रामवरही बंदी घालण्यात आली आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे.









