अमेरिकेचा अव्वल दर्जाचा जलतरणपटू मायकल फेल्प्स आता निवृत्तीच्या पडद्याआड गेला आहे. रविवारी तो टोकियो ऍक्वेटिक्स सेंटरवर केवळ एक चाहता म्हणून उपस्थित होता. मात्र, फेल्प्स आता शर्यतीत उतरणार नसला तरी अमेरिकेने जलतरणातील आपली हुकूमत यावेळी देखील सुस्पष्ट केली. अमेरिकेने रविवारी दिवसभरातील 12 पैकी 6 पदके जिंकत आपला वरचष्मा गाजवला.
प्रारंभी, चेस कॅलिस्झने 400 मीटर्स वैयक्तिक मेडले गटात सुवर्ण जिंकले तर केरॅन स्मिथने कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर जलतरणाच्या पोडियमवर अमेरिकेचे जलतरणपटू सातत्याने चमकत राहिले.
‘आमचे जलतरणपटू सातत्याने सुवर्ण, रौप्य व कांस्यपैकी कोणते ना कोणते पदक जिंकत राहिले आणि हे चित्र नेहमीप्रमाणे आनंददायी ठरले’, असे ऍबे वेत्झेलने नमूद केले. स्वतः वेत्झेलचा कांस्य जिंकणाऱया 4ƒ100 मीटर्स फ्री स्टाईल रिले संघात समावेश राहिला.
400 मीटर्स वैयक्तिक गटात सुवर्ण जिंकणाऱया चेस कॅलिस्झने यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्येही दुसरे स्थान संपादन केले होते. 27 वर्षीय चेस कॅलिस्झने कोरोनामुळे मागील वर्ष कठीण ठरल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी आम्ही 4 नव्हे तर 5 वर्षांपासून तयारी करत होतो, असेही कॅलिस्झने स्पष्ट केले.









