फॉगनिनी, कॅरेन पराभूत, शॅपोव्हॅलोव्ह, इस्नेरची आगेकूच
वृत्तसंस्था/ ऑकलंड
दिवसातील दुसरा सामना खेळताना फेलिसियानो लोपेझने अग्रमानांकित व जागतिक बाराव्या मानांकित फॅबिओ फॉगनिनीचा पराभव करून एटीपी ऑकलंड क्लासिक टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
रशियाचा तिसरा मानांकित कॅरेन खचानोव्हलाही पराभवाचा धक्का बसला. त्याला ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने हरविले तर दुसरे व चौथे मानांकन मिळालेले डेनिस शॅपोव्हॅलोव्ह व जॉन इस्नेर यांनी शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या 38 वर्षीय लोपेझला दिवसात दोन सामने खेळावे लागले. पावसामुळे आदल्या दिवशीचा सामना लांबणीवर टाकावा लागला होता. त्याला दोन्ही सामन्यात तीन सेट्स खेळावे लागले आणि यासाठी तो सुमारे साडेचार तास कोर्टवर होता. त्याने आधी पाब्लो अँडय़ुअरला 3-6, 7-6 (7-4), 6-4 असे हरविले आणि तीन तासांच्या विश्रांतीनंतर फॉगनिनीला 3-6, 6-4, 6-3 असे नमवित आगेकूच केली.
उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत पोलंडच्या हय़ुबर्ट हुरकाझशी होईल. सहाव्या मानांकित हुरकाझने स्वीडनच्या मायकेल वायमरचा 6-2, 7-6 (7-2) असा पराभव केला. दिवसात दोन सामने खेळणे फायदेशीर ठरल्याचे लोपेझने म्हटले असले तरी अन्य दोन खेळाडूंना दुसऱया सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. इटलीच्या मार्को सेक्चिनाटोने तीन तासाच्या मॅरेथॉन लढतीत लिओनार्दो मेयरचा पराभव केला. यातील दुसऱया सेटमधील टायब्रेकर त्याने 20-18 असा जिंकला. पण नंतर दुसऱया फेरीच्या सामन्यात त्याला फ्रान्सच्या युगो हम्बर्टकडून 1-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
इटलीच्या आंद्रेयास सेपीने सातव्या मानांकित ऍड्रियन मॅनारिनोचा तीन सेट्समध्ये पराभव केल्यानंतर दुसऱया फेरीत त्याला काईल एडमंडकडून 6-3, 7-6 (7-4) असा पराभूत व्हावे लागले. एडमंडची पुढील लढत जॉन इस्नेरशी होईल. इस्नेरने दुसऱया फेरीत टेनीस सँडग्रेनचा तीन सेट्समध्ये 7-6 (7-3), 6-7 (1-7), 6-3 असा पराभव केला. इस्नेरने या सामन्यात 16 बिनतोड सर्व्हिस केल्या. कॅनडाच्या शॅपोव्हॅलोव्हने आपल्याच देशाच्या व्हॅसेल पॉस्पिसिलवर 6-4, 7-6 (7-2) अशी मात केली तर मिलनने खचानोव्हवर 4-6, 6-3, 6-3 अशी मात करून शेवटच्या आठमधील स्थान निश्चित केले.









