बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील महत्त्वाचा भाग असणाऱया समादेवी गल्लीत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. फेरीवाले रस्त्यावरच फळे तसेच इतर साहित्य विक्री करत आहेत. यामुळे बाजारात येणाऱया नागरिकांबरोबरच दुकानदारांना याचा फटका बसत आहे. ही समस्या सोडवावी याकरिता गल्लीतील दुकानदारांनी बेळगावच्या प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
समादेवी गल्लीत अनेक व्यावसायिक आस्थापने आहेत. त्यामुळे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. परंतु दुकानांसमोरच फेरीवाले आपल्या हातगाडय़ा व इतर साहित्य लावत असल्यामुळे याचा फटका दुकानदारांना सोसावा लागत आहे. याचबरोबर वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली असल्यामुळे यावर प्रशासनाने योग्य तोडगा काढून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
हे पत्र बेळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे दुकानदारांचे लक्ष लागले आहे. रस्त्यावर अनधिकृतरीत्या विक्री करणाऱया फेरीवाल्यांना हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांमधूनही होत आहे.









