प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिपेने अतिक्रमण निर्मुलनासंदर्भात कारवाईची भुमिका घेतली आहे. त्याची सुरूवात महाद्वार रोड येथून झाली आहे. शहरात लोकसंख्येच्या तुलनेत फेरीवाल्यांची संख्या अडीच टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करूनच कारवाई करावी, अशी फेरीवाला संघटनेची मागणी आहे. यासंदर्भात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोमवारी, 15 रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहात मनपा प्रशासन आणि फेरीवाल्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कॉ. दिलीप पवार यांनी दिली. सोमवारच्या निर्णयानंतर फेरीवाला संघटनेच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे.
महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेकडे 3 हजार फेरीवाल्यांची नोंद आहे.
साधारतः स्थिर, फिरते आणि तात्पुरते फेरीवाले असे तीन गटात फेरीवाल्यांचे वर्गीकरण होते. गेली 50 वर्षे शहरात नैसर्गिक मंडई असलेल्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करत असतील तर त्यांना कायद्याने बाजूला करता येत नाही. तर त्यांना व्यवसायासाठी 3 बाय 3 आकाराची जागा देणे अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनाने महाद्वार रोडवर त्यासाठी चौकोन आखून दिले, पण त्याला फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, रविवारी आयुक्त, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महाद्वार रोडची पाहणी केल्याची माहिती फेरीवाला संघटनेने दिली.
संघटनेच्या बैठकीत फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीला आर. के. पवार, कॉ. दिलीप पवार उपस्थित होते. यावेळी सोमवारी, 15 रोजी दुपारी 1 वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक होणार आहे. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. बलकवडे आणि फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत सकारात्मक निर्णय शक्य आहे, असे कॉ. दिलीप पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.









