ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय वायुदलाची ताकद कैक पटींनी वाढवणाऱ्या राफेल या फ्रान्स बनावटीच्या अत्याधुनिक विमानांची पुढची खेप लवकरच भारतात येणार आहे. यापूर्वी 30 राफेल विमाने भारतीय वायुदलात दाखल झाली आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात 3 तर उर्वरित 3 विमानं एप्रिलमध्ये दाखल होणार आहेत.
भारताने 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांचा खरेदी करार केला होता. त्यानुसार आतापर्यंत फ्रान्सने 30 राफेल भारताच्या स्वाधीन केली आहेत. उर्वरित 6 विमाने लवकरच भारतात दाखल होतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात यामधील तीन विमाने वायुदलाच्या ताफ्यात सामील होतील. तर अखेरची तीन विमाने एप्रिलमध्ये भारतात दाखल होतील.
राफेल हे जरी अत्याधुनिक असले तरी बदलत्या काळानुसार अखेरच्या तीन विमांनांमध्ये काही बदल करण्यात येणार आहे. भारतीय लष्कराने ते आवश्यक बदल फ्रान्सला सूचविले आहेत. त्यामध्ये या राफेल विमानांमध्ये हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय, फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर, जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक, विमानाच्या दिशेने येणाऱया क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा असे काही बदल हे भारतीय वायूदलाने सुचवले आहेत. त्यामुळे अखेरची ही विमाने आणखी अत्याधुनिक असणार आहेत.