खरी ओळख लपवून खोटय़ा नावाने वावरणाऱया व्यक्तीला सोशल मीडियावाले फेक आयडी संबोधनाने ओळखतात. सहसा यामध्ये मुलीचे नाव धारण करून वावरणारे मुलगेच अधिक असतात. या सवयीची कारणे अनेक असतील. पण परंपरा फार जुनी आहे. एक गमतीदार उदाहरण द्यायचे तर कोकिळेचे. वसंतात कोकिळा गाते असे कवी लोक म्हणतात. तर शास्त्रज्ञ आणि निरीक्षक लोक म्हणतात की प्रत्यक्षात कोकीळच गातो. असेल बुवा. पशुपक्ष्यांमध्ये संगणक, इंटरनेट आणि सोशल मीडिया असता तर हा कोकीळ त्यांच्यातला फेक आय डी म्हणून प्रसिद्ध झाला असता.
सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनमुळे हल्ली कोणीही उठतो (किंवा उठते) आणि आपण लिहिलेली रचना (जी म्हणे कविता असते) फेसबुकवर प्रकाशित करू शकतो-शकते. कविता लिहिणे तिन्ही त्रिकाळ सोपे होते, पण पूर्वी छापून येणे दुष्कर होते. त्या काळात काही ‘रसिक’ संपादक स्त्रियांच्याच साहित्याला अग्रक्रम देण्यासाठी प्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) होते. पुरुष लोक त्यांना काल्पनिक स्त्रीच्या नावाने कविता पाठवीत. अस्मादिकांनी एकदा अशा स्पर्धेत टोपण नावाने कविता पाठवली. तिला तिसरा क्रमांकही मिळाला. पण संपादकांनी छापले होते की विजेत्यांनी स्वतः येऊन बक्षीस न्यावे. त्यामुळे आमचे बक्षीस हुकले!
त्याकाळी संपादकच असे होते असे नाही. लेखकदेखील होते. बेळगावजवळच्या कोणा साहित्य रसिकाने मोहिनी हे नाव धारण करून अनेक श्रे÷ आणि ज्ये÷ लेखकांना दीर्घकाळ खुशीपत्रे पाठवली होती आणि लेखकांची लघळ उत्तरे जपून ठेवली होती. पुढे या टोपण नावाचा पर्दाफाश झाल्यावर साहित्यविश्वात चांगलीच खळबळ उडाली होती. जयवंत दळवी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन एक खुसखुशीत लेखही लिहिला
होता.
कॉलेजात असताना एका मित्राला अशीच कल्पना सुचलेली. त्याने सर्व वह्या पुस्तकांवर काल्पनिक मुलीचे नाव आणि मागील पानावर पत्ता लिहिला होता. कधी यातली एखादी चीज हरवली आणि कोणा मुलाला सापडली तर तो ती परत करण्यासाठी आशाळभूतपणे घरी येईल ही त्याची कल्पना. पण तसे काही झाले नाही. उलट नागरिकशास्त्राची टय़ूटोरियल्स सबमिट करताना एका गठ्ठय़ावर त्याने चुकून ते काल्पनिक नाव टाकले होते आणि तो घोळ निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले होते.








