मिरवणूकीत ‘महिलादिनी’ महिला पथकाचा सन्मान
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा तालुक्यातील राज्यस्तरीय सार्वजनिक शिमगोत्सव मिरवणूकीसाठी राज्य सरकारतर्फे 16 लाख रूपये फंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. शिमगोत्सवात सहभागी लोकनृत्य, वेशभूषा, चित्ररथ देखावे व रोमटामेळ पथकांना पारितोषिकाच्या स्वरूपात एकूण रूपये 6 लाखांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे पदाधिकारी व फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.
फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीची कृषी मंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी फोंडा पालीका सभागृहात पुढील रूपरेषा ठरविण्याबाबत महत्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी क्रिडा मंत्री गोविंद गावडे, नगराध्यक्ष रितेश नाईक, उप नगराध्यक्ष अर्चना डांगी, उपजिल्हाधिकारी सिताराम सावळ, पालीकेचे मुख्याधिकारी सोहम उस्कईकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की शिमगोत्सव मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या पथकांना समितीच्या स्वयंसेवकांनी आपुलकीची वागणूक द्यावी. कलाकारांचा मान राखत स्पर्धा वेळेत सुरू होण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यानी धडपड घ्यावी असे आवाहन केले. मंत्री गोविंद गावडे यांनी स्वखर्चाने शिमगोप्रेमींसाठी दोन हजार फेट्याची व्यवस्था तर समाजसेविका वेदांगी ढवळीकर यांनी 500 फेटे पुरविण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.
यंदा पर्यटन खाते आणि फोंडा नगरपालीकेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येत असून सन 1980 सालापासून सुमारे 43 वर्षे ही शिमगोत्सवाची परंपरा फोंडा तालुक्याने पाळलेली असल्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
जागतिक महिलादिनी महिला पथकाचा होणार सन्मान
बुधवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शिमगोत्सवात सहभागी होणाऱ्या महिला रोमटामेळ पथकांला खास बक्षिस देऊन गौरव करण्यात यावा अशी सुचना पालीकेच्या उपनगराध्यक्ष अर्चना डांगी यांनी यावेळी केली. मंडळातर्फे त्वरीत या सुचनेला मान्यता देण्यात आली. त्यामुळे महिला पथकाने शिमगोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मंत्री रवी नाईक यांनी केले.
शिगमोत्सवाला प्रारंभ 5 मार्च रोजी म्हार्दोळ येथील महालसा देवीला ढोल ताशांच्या गजरात नमन घालून करण्यात येणार आहे. रविवारी महालसा देवीची पालखी उत्सव असल्याने शिमगोत्सव नमनाचा कार्यक्रम वेळेत आटोपून घेण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन भाई नाईक यांनी केले. शिमगोत्सव कार्यालयाचे उद्घाटन बुधवार 1 मार्च रोजी तिस्क फोंडा येथे होणार आहे. सायं. 5 वा. अर्जाचे वितरण करण्यात येईल. सर्व पथकांनी गुरूवार 6 रोजी सायं. 5 वा. पर्यत अर्जासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही. शिमगोत्सव मिरवणूकीला बुधवार 8 मार्च रोजी तिस्क फोंडा येथून श्रीफळ वाढवून करण्यात येणार आहे. सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपईच्या प्रारंभी रोमटामेळाने मिरवणूकीला प्रारंभ होईल. सुरळीत वाहतूकीसाठी रोमटामेळ दुर्भाट मार्गावरून तर चित्ररथाची सुरूवात मडगाव मार्गावरून करण्याची सोय वाहतूक खात्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज काणकोणकर यांनी सुचविलेली आहे.
फोंड्यातील शिमगोत्सव मिरवणकीसाठी रू. 6 लाखाची बक्षिसे
चित्ररथ देखावा प्रथम रू. 60000, द्वितीय रू. 50000, तृतीय रू. 40000 अशी पारितोषिके देण्यात येतील. रोमटामेळासाठी प्रथम रू. 35000, द्वितीय रू. 25000, तृतीय रू. 15000, चौथे रू. 10000, पाचवे रू. 8000. लोकनृत्यासाठी प्रथम रू. 20000, द्वितीय रू. 15000, तृतीय रू. 10000, वेशभूषेसाठी वैयक्तिक पारितोषिक वरिष्ठ गट प्रथम रू. 7000, द्वितीय रू. 5000, तृतीय रू. 3000, तसेच कनिष्ठ गटासाठी प्रथम रू. 2500, द्वितीय रू. 1500, तृतीय रू. 1000 तसेच विविध गटासाठी उत्तेजनार्थ पारितोषिकांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकलाकारांना प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात येणार आहे. एकूण चित्ररथ देखाव्यासाठी रू. 3,32000 रोमटामेळ पथकांना रू. 1,35000, लोकनृत्य रू. 1,03000 वेशभूषा वरिष्ठसाठी रू. 22,000 तर कनिष्ठासाठी रू. 8000 अशी एकूण 6 लाख रूपयांची रक्कम बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहे.
चार मतदारसंघातील एकूण 20 ज्येष्ठ कलाकारांचा होणार सत्कार
शिमगोत्सवात सहभागी होत लोककला टिकवून ठेवण्यासाठी योगदान दिलेल्या फोंडा तालूक्यातील शिरोडा, मडकई, फोंडा व प्रियोळ मतदारासंघातील 5 ज्येष्ठ कलाकारांची निवड करण्यासाठी समिती निवडण्यात येणार आहे. शिमगोत्सव मिरवणूकी दरम्यान 20 ही कलाकारांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. शिमगोत्सवाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी येत्या रविवार 26 रोजी राजीव कला मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.









