कोरोनामुळे सण-समारंभावर निर्बंध आल्याने शेतकरी-फूल विक्रेते व्यावसायिक सलग दुसऱया वर्षीही अडचणीत
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने याचा फटका फूल उत्पादकांना तसेच फूलविक्री करणाऱया व्यावसायिकांनाही बसला आहे. शोभिवंत फुलांची उलाढाल ऐन हंगामात थंडावली आहे. लग्नसराईचा हंगाम वाया जात असल्याने फूलविक्रेत्यांसह फूल उत्पादक शेतकरी व नर्सरी मालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
गतवर्षी पूर्ण हंगाम हातातून गेल्यानंतर पुन्हा तीच वेळ आल्याने फूल उत्पादक आणि विक्रेते हतबल झाले आहेत. महिन्याभरापासून लग्न समारंभावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे साधेपणाने लग्नसोहळे पार पडत असताना झगमगाट दिसेनासा झाला आहे. फक्त वधू-वराला लागणारे हारतुरे यांनाच मागणी आहे. मात्र लॉकडाऊनमुळे फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे या व्यवसायावर आधारित कुटुंबांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम वाया जात असल्याने कोरोनाच्या काळात फुलांचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेत फुलांना योग्य दर मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेला खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. लग्नसराईत अथवा घरगुती सजावटीसाठी शोभिवंत झाडांच्या कुंडय़ांना मोठी मागणी असते. यातून चांगले उत्पन्न मिळते. परंतु कोरोनाने यावरही पाणी फेरले आहे.
सध्या लग्न समारंभही साधेपणाने होत असल्याने फुलांची मागणी कमी झाली आहे. काही प्रमाणात फुलांची विक्री सुरू असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. काही शेतकऱयांनी योग्य दर मिळत नसल्याने फुले न तोडता शेतातच ठेवली आहेत. मात्र ती कुजू लागली आहेत. एकंदरीत कोरोनाचा फटका अन्य व्यावसायिकांसह फुलांचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांनाही बसला आहे. खानापूर तालुक्यातील बऱयाच शेतकऱयांनी ग्रीनहाऊस करून फूल शेती केली आहे. यासाठी बँकांकडून कर्जही घेतले आहे. पण क्लोजडाऊनमुळे ऐन हंगामात शेतकरी मोठय़ा संकटात सापडले आहेत.









