कावळेवाडी अंगणवाडी शाळेची इमारत बनली धोकादायक : बालकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
आजची लहान बालके उद्याच्या भारतदेशाचे उज्ज्वल भवितव्य आहेत. येणारी पुढील पिढीच देशाला सामर्थ्यवान अधिक प्रमाणात बनविणार आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी व शिक्षणासाठी विशेष योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजना ग्रामीण भागात पुरविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कावळेवाडी गावातील अंगणवाडी शाळेची इमारत धोकादायक बनली आहे.
प्रशासनाचे या अंगणवाडीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी पालक व ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने बालकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. इमारतीचा दरवाजा खराब झाला आहे. गळती लागून अंगणवाडी शाळेत पाणी शिरत असल्याने आता या बालकांना बसवायचे कुठे? हा प्रश्न उभा ठाकला आहे. ग्रामीण भागात सर्रास गावांमध्ये एलकेजी, युकेजी अशी पद्धत अद्यापही कमी प्रमाणात आहे. तालुक्मयातील लोकांची शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने सरकारी शाळा, अंगणवाडय़ांचाच त्यांना आधार घ्यावा लागतो. लहान बालकांना बालपणापासून शाळेची ओढ निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांची देखभाल करण्यात येते. मात्र, कावळेवाडी अंगणवाडीची परिस्थिती पाहता इथे फूल फुलण्याआधीच कोमेजून जाण्याची भीती अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी खोलीचा मुख्य दरवाजा बसविण्यात आला होता. तो पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. अंगणवाडी शाळेत जाण्यासाठी पायरीसुद्धा नाही. यामुळे बालकांना अंगणवाडीच्या वर्गखोलीत शिरताना त्रास सहन करावा लागत आहे. अंगणवाडीची इमारत धोकादायक बनली असल्याने गेल्या पाच-सहा दिवसांपासून या अंगणवाडीमध्ये बालकांना बसविण्यात आलेले नाही. पर्यायी जागा म्हणून प्राथमिक मराठी शाळेच्या वर्गखोलीची साफसफाई करण्यात आली आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी बालकांना बसविण्याचा विचार ग्रामस्थ करीत
आहेत. अंगणवाडीतील बालकांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही. शौचालय बांधण्यासाठी भिंती बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, काम अर्धवट स्थितीत असल्याने बालकांची गैरसोय होत आहे.
दहा-बारा वर्षांपूर्वी अंगणवाडीची जी इमारत होती, त्याच इमारतीला गिलावा करून बालकांना बसविण्यात येत होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
बालकांसाठी खुर्च्या व टेबल देण्यात आले होते. पण शौचालयासाठी बसविण्यात आलेल्या पाईपमधून उंदीर व घुशी अंगणवाडीत शिरून त्यांनी त्या टेबल व खुर्च्यांचा काही भाग पूर्णपणे कुरतडून टाकला आहे. यामुळे साहित्याचेही नुकसान झाले आहे.
बालकांचे हाल आम्हाला बघवत नाहीत

कावळेवाडी गावच्या अंगणवाडी शाळेकडे प्रशासनाबरोबरच बिजगर्णी ग्रा.पं.चेही दुर्लक्ष झाले आहे. पीडीओंना वारंवार सांगूनही त्यांनी कानाडोळा केला आहे. या इमारतीसंदर्भात ता.पं. अधिकाऱयांना माहिती दिली आहे. बालकांचे हाल आम्हाला बघवत नाहीत. अंगणवाडीचा विकास करण्यासाठी ग्रा.पं. फंडमधून निधीची मुभा आहे. मात्र, ग्राम पंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. येत्या चार-पाच दिवसात योग्य तोडगा न काढल्यास आम्ही आंदोलन छेडणार आहे, असे या गावचे वकील नामदेव मोरे यांनी सांगितले.
सरकारने खेडेगावातल्या अंगणवाडी-शाळांकडे लक्ष द्यावे

कावळेवाडी गावात एकच अंगणवाडी आहे. या अंगणवाडीची दयनीय अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी पीडीओ स्वतः भेट देऊन अंगणवाडीची पाहणी करून गेले आहेत. पण त्यांनी याकडे व बालकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. पाहणीनंतर पीडीओंकडून कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. सरकारने खेडेगावातल्या अंगणवाडी-शाळांकडे लक्ष द्यावे, असे मत येथील रहिवासी जोतिबा मोरे यांनी मांडले.
बालकांना अंगणवाडीत पाठवून कसे द्यायचे?

बाल कल्याण खाते व शिशू अभिवृद्धी योजना यांच्यामार्फत बालकांसाठी बऱयाच योजना राबविल्या जातात. मग आमच्या बालकांना बसण्यासाठी चांगली इमारत का मिळू शकत नाही? इमारतीला गळती लागल्याने त्यांना बसण्याची सोय नाही. मग आमच्या बालकांना अंगणवाडीत पाठवून कसे द्यायचे? याची चिंता लागून आहे. वरिष्ट अधिकाऱयांनी या अंगणवाडीची त्वरित पाहणी करावी, अशी मागणी येथील रहिवासी विक्रम बाचीकर यांनी केली.









