अनेक प्रदूषित घटक श्वासावाटे आपल्या शरीरात जातात. या घटकांमुळे
फुफ्फुसांचं नुकसान होऊ शकतं. सध्याच्या कोरोनाकाळात तर फुफ्फुसं अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. योग्य आहार घेऊन आपण फुफ्फुसं बळकट करू शकतो.
* फुफ्फुसाच्या बळकटीसाठी ‘क’ जीवनसत्त्व खूप आवश्यक आहे. ‘क’ जीवनसत्त्वयुक्त संत्री, लिंबासारखी आंबट फळं खाता येतील. तसंच मिरचीतही ‘क’ जीवनसत्त्व असतं. हे जीवनसत्त्व शरीरातले विषारी घटक आणि फ्री रेडिकल्स बाहेर टाकण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतं. यामुळे शरीरातल्या विविध अवयवांसोबतच फुफ्फुसंही निरोगी राहतात.
* बीटामध्ये अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. बीट हे साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे. यात लोह, सोडियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आदी पोषक घटक असतात. बीटामधल्या या घटकांमुळे श्वासनलिकेतला कफ निघून जातो आणि श्वसनाला अडथळे येत नाहीत. यामुळे फुफ्फुसांचं आरोग्यही उत्तम राहतं. परिणामी, बीटाचं नियमित सेवन करायला हवं.
* बर्याचजणांना भोपळा आवडत नाही. पण
फुफ्फुसांच्या बळकटीसाठी भोपळा खायला हवा. भोपळ्यात विशेष प्रकारचे कॅरोटिनॉइड्स असतात. या कॅरोटिनॉइड्स मध्ये बीटा केरोटिन, ल्युटिनसारखे अँटीऑक्सिडंट्सनेयुक्त आणि दाह कमी करणारे घटक असतात. या घटकांमुळे
फुफ्फुसांना बळकटी मिळते.
* दररोज सफरचंद खा आणि डॉक्टरांना लांब ठेवा, असं म्हटलं जातं. सफरचंदात तंतुमय घटक आणि बरीच जीवनसत्त्वं असतात. यातला फ्वेवॉनॉइड क्वरसिटिन हा घटक फुफ्फुसांना बळकटी देतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी रोज एक सफरचंद खावं.









