सोमवारी आमदार पंतप्रधान, भाजपाध्यक्षांची भेट घेणार
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर त्यातील काही जणांना मंत्रिपदे देण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. दिगंबर कामत व आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे जवळपास निश्चित झाले असून मायकल लोबो यांना मंत्रिपद द्यावे की नको याबाबत निर्णय झालेला नाही. पुढील आठवडय़ात कदाचित मंत्रिमंडळाची पुनर्रचना होऊन काही मंत्र्यांना अर्धचंद्र तर काही आमदारांना मंत्रिपद देण्याचे ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी येत्या सोमवारी आमदारांना दिल्लीत नेण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे त्यांची भेट करुन देण्यात येणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी अचानक राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेतल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होणार अशा तर्क-वितर्कांना उधाण आले. तथापि, ही भेट पूर्वनियोजित होती आणि शपथविधीसाठी आपण गेलो नव्हतो असा खुलासा डॉ. सावंत यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपालांना आपण भेटलो. त्यात कोणताही रायकीय हेतू नव्हता, असा दावा डॉ. सावंत यांनी केला.
भाजपमध्ये विलीन झाल्याची अधिसूचना जारी
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या दोन तृतीयांश गट भाजपमध्ये विलिन झाल्याची अधिसूचना गोवा विधिमंडळाने जारी केली असून त्या विलिनीकरणास मान्यता देऊन ते स्वीकारण्यात आल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली. बुधवारी रात्री उशिरा ते दिल्ली येथून पर्वरी विधानसभेतील आपल्या कार्यालयात पोहोचले आणि फुटीर गटाने सादर केलेल्या ठरावाची तपासणी केली. विलिनीकरणासाठी आवश्यक असलेली आमदारांची संख्या पुरेशी असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर विलिनीकरणाची माहिती विधानसभेतील सर्व आमदारांना देण्यात आल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. शिवाय भाजपमध्ये विलीन झालेल्या आमदारांची नावेही अधिसूचनेत देण्यात आली आहेत. या विलिनीकरणाची दखल घेण्यात आली असून त्याप्रमाणे विधानसभागृहात त्या आमदारांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.
भाजपमध्येच संघर्ष
काँगेसच्या 8 फुटीर आमदारांना प्रवेश दिल्यानंतर भाजपमध्ये खळबळ माजली असून तातडीने सुकाणू समितीची (कोअर कमिटी) बैठक घेण्यात आली. त्यात प्रवेशाचे पडसाद उमटल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार व संभाव्य उमेदवार आणि आता आयात केलेले आमदार तसेच त्यांचे कार्यकर्ते यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्या बैठकीत निश्चित करण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष तानावडे यांनी आपले वैयक्तिक मत व्यक्त केल्यामुळे भाजपमध्ये या 8 जणांच्या प्रवेशानंतर संघर्ष उफाळून आल्याचे चित्र दिसून येत आहे.
गोवा विधानसभेतील विविध पक्षांचे बलाबल केंद्रातील भाजपचा निर्णय पाळावाच लागतो भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे स्पष्टीकरण
काँग्रेसच्या 8 फुटीर आमदारांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना भाजपात प्रवेश देण्याचा आदेश प्राप्त झाला. तो आदेश पाळण्याशिवाय पर्याय नव्हता. केंद्रातील भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी पुढे नमूद केले.
तानावडे म्हणाले की काल गुरुवारी सकाळी झालेल्या भाजपच्या बैठकीत शपथविधी किंवा मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांची हकालपट्टी याबाबत कोणतेही निर्णय झालेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात यायचे कार्यक्रम याबाबत भाजपच्या सुकाणू समितीमध्ये (कोअर कमिटी) चर्चा झाली. नवीन राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला. नव्याने पक्षात आलेले आमदार व त्यांच्या मतदारसंघातील माजी भाजप आमदार यांच्या लवकरच बैठका घेण्यात येणार असून त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की सध्या मंत्रिमंडळात बदल करण्याचा कोणताही इरादा नाही. नवीन 8 आमदारांना नवी दिल्ली येथे नेण्यात येणार असून त्यांची पंतप्रधान व अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट घडवून आणण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की हे होणे अपेक्षित होते आणि त्यात धक्का बसण्यासारखे काही नाही. विरोधकांना त्यांच्या मतदारसंघात विकास होत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी भाजपात विकासासाठी प्रवेश केल्याचे गुदिन्हो म्हणाले.









