क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या फातोर्डास्थित फुटबॉल प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख टोनी काब्राल यांचे आजाराने निधन झाले. आयरीशचे फुटबॉल प्रशिक्षक कॉलीन टोल यांच्या प्रशिक्षणाखालील तयार झालेल्या 23 वर्षांखालील प्री-ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतलेल्या भारतीय फुटबॉल संघाचे ते व्यवस्थापक होते आणि 2002 सालापासून ते भारतील फुटबॉल महासंघाच्या सेवेत होते.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे स्पर्धा संचालक अनिल कामत यांनी टोनी काब्राल यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे. फातोर्डा येथील एआयएफएफच्या प्रशिक्षण केंद्रात काब्राल यांनी मन लाऊन काम केले व दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरून येण्यास वेळ लागेल, असे कामत म्हणाले.
भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक आर्मांद कुलासो, सालसेत फुटबॉल क्लबचे अध्यक्ष ज्यो डायस, गोवा फुटबॉल विकास मंडळाचे चेअरमन तसेच गोवा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष अँथनी पांगो यांनीही टोनी काब्राल यांच्या दुःखद निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.









