वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रकृती समस्येच्या कारणावरून आपल्याला फुटबॉल सराव करण्यास मज्जाव करण्यास आल्याने अन्वर अली नावाच्या 20 वर्षीय फुटबॉलपटूने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनविरूद्ध न्यायालयात धाव घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये अन्वर अलीने यापूर्वी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अन्वर अलीला हृदयाच्या समस्या वारंवार जाणवत असल्याने त्याला फुटबॉल सरावात सहभागी होण्यास अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने निर्बंध घातले आहेत. त्याऐवजी त्याला प्रशिक्षण किंवा प्रशासनात काम देण्याची ऑफर दिली आहे. पण आपला खेळण्याचा हक्क डावलण्यात आल्याचे मानून फेडरेशनच्या या निर्णयाविरूद्ध अन्वर अलीने दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अमिताब तिवारी आणि अभिमन्यू तिवारी हे अन्वर अलीचे वकील आहेत. हे प्रकरण न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर चालणार आहे.









