कोल्हापूर / प्रतिनिधी
राजकारणातील एक चांगला माणूस म्हणून पाहिले गेलेले आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूरी फुटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक खेळाडूंनी आमचा पाठीराखा गेला, अशी भावना व्यक्त केली. 1978 ते 1984 या कालावधीत पाटाकडील तालीम मंडळ फुटबॉल संघातून खेळलेल्या सर्वांचे अण्ण म्हणून सुपरिचित असलेल्या आमदार जाधव यांना फुटबॉलपटूंच्या व्यथा माहिती होत्या. त्यामुळेच त्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामन्यांमध्ये खेळणाऱ्या पेठापेठांमधील शेकडो खेळाडूंना महागडे स्टडबुट, किटसह आर्थिक मदत दिली. त्यांच्या एकुणच फुटबॉलप्रेमावर टाकलेला हा प्रकाशझोत…
फुटबॉलपटू, उद्योजक ते आमदार असा यशस्वी प्रवास केलेले चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरी फुटबॉलच्या विकासासाठी दिलेले योगदान नजरेआड करता येणार नाही. त्यांनी कोल्हापुरी फुटबॉलच्या विकासाचे पुढील 30 वर्षाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवले होते. हेच व्हिजन घेऊन त्यांनी अनेक फुटबॉल स्पर्धांना हजारो रुपयांची बक्षिसे दिली. 2018 साली मात्र त्यांनी कोल्हापूरी फुटबॉल विश्वात स्पर्धा आयोजक म्हणून प्रवेश केला. फुटबॉलच्या माध्यमातून राजकारणात जाण्याचे त्यांचे लक्ष्य होते. तुम्ही कोणत्या पक्षात जाणार? असा प्रश्नही फुटबॉलप्रेमी त्यांना विचारत होते. यावेळी जाधव हे मला सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगून वेळ मारत होते. राजकारणात जाण्यासाठी पैसा, प्रसिद्धीचा मेळ घालावा लागतो, याची जाण त्यांना होती. त्यांच्याकडे फौंड्री उद्योगातून कष्टाने कमावलेला पैसा होता. पण म्हणावी तितकी प्रसिद्धी नव्हती. त्यामुळेच त्यांनी प्रसिद्धी वाढवण्यासाठी फुटबॉल महासंग्राम स्पर्धा आयोजकांशी चर्चा करुन 2018 साली आपल्याच नावाने म्हणजे चंद्रकांत फुटबॉल महासंग्राम स्पर्धा आयोजित करुन तिला लाखो रुपयांचे बक्षीसे दिली. त्यांची ही कृती 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काही अंशी फळाला आली. आमदार सतेज पाटील यांच्याशी आलेल्या संपर्कातून जाधव यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊन ते निवडणूकीत विजयी देखील झाले. त्यांच्या विजयामागील बऱ्याच कारणांपैकी फुटबॉलमध्ये स्पर्धा आयोजक म्हणून झालेली एंट्री हे एक कारण आले.
2017 पर्यंत छत्रपती शाहू स्टेडियमवरील स्पर्धामध्ये विजेत्या संघाला दीड ते दोन लाख आणि उपविजेत्या संघाला 75 हजार हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळत होते. जाधव यांनी संघांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी म्हणून बक्षीसांची व्याप्ती वाढली. त्यानुसार त्यांनी चंद्रकांत फुटबॉल महासंग्राम स्पर्धेचे आयोजन करुन विजेत्या संघाला 5 लाख 11 हजार 111 रुपये आणि उपविजेत्या संघाला 3 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस दिले. या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यास विक्रमी गर्दी झालीच. शिवाय विजेत्या व उपविजेत्या संघांना मिळालेली मोठ्या रोख रकमेची बक्षीसे आणि उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस म्हणून दिलेल्या दुचाकी गाड्यांची चर्चा महाराष्ट्राभर रंगली. अशाच पद्धतीने 2019 सालीही चंद्रकांत महासंग्राम आयोजित करुन त्यांनी फुटबॉलप्रेमींची मने जिंकली.
कोल्हापूरी फुटबॉलसाठी योगदान देतानाच जाधव यांनी एफ. सी. कोल्हापूर सिटीची 2018 साली स्थापना केली. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या नियम-अटी पूर्ण करुन 13, 15, 18 वर्षाखालील मुलांचे संघही तयार केले. प्रशिक्षणासाठी स्पेनचा प्रशिक्षकही बोलवला. त्याच्या प्रशिक्षणाखाली तयार झालेल्या 13 व 15 वर्षाखालील मुलांच्या संघांला फेडरेशनने मान्यता दिली. यानंतर जाधव यांनी एफ. सी. कोल्हापूर सिटी हा महिला संघही सुरु केला. या संघाने कसून सराव करत इंडियन वुमन्स लिग फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या क्वालिफाईंग स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्यामुळे संघाला महाराष्ट्रातील एकमेव संघ म्हणून लुधियाना आणि बेंगळूरमधील इंडियन वुमन्स लिगमध्ये खेळता आले. अलीकडेच जाधव यांनी प्रथमश्रेणी आयलिगसाठी पुरुष संघ बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यांच्या निधनाने ते अधुरे राहिले आहे. ते आता कोण पूर्ण करणार याचीच आता प्रतिक्षा असणार आहे.