स्मार्ट रस्त्याशेजारी खोकी थाटण्याची संकल्पना स्मार्ट सिटी योजनेत आहे का? कुवेंपूनगरातील नागरिकांचा सवाल
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून दुतर्फा फुटपाथ व सायकल ट्रकची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र फुटपाथ तयार होताच फेरीवाले आणि खोकेधारक व्यवसाय सुरू करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे स्मार्ट रस्त्याशेजारी खोकी थाटण्याची संकल्पना स्मार्ट सिटी योजनेत आहे का? असा मुद्दा कुवेंपूनगर परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहराचा सहभाग स्मार्ट सिटी योजनेंतर्गत झाल्यानंतर विविध रस्त्यांचा विकास करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून फुटपाथ, दुभाजक, डेकोरेटीव्ह लाईट अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच काही ठिकाणी स्मार्ट बसथांबे निर्माण करून प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
उपनगरातील काही रस्त्यांशेजारी सायकल ट्रक व पादचाऱयांसाठी फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र निर्माण करण्यात आलेल्या फुटपाथवर खोके आणि फेरीवाले व्यवसाय थाटत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्मार्ट सिटीने निर्माण केलेल्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी सूचना स्मार्ट सिटी कंपनीचे तत्कालीन कार्यकारी संचालक शशिधर कुरेर यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. पादचाऱयांसाठी फुटपाथ निर्माण करण्यात आले असून, खोकी आणि फेरीवाले, फळ विपेत्यांसाठी नाही. त्यामुळे पादचाऱयांसाठी फुटपाथ खुले ठेवावेत, अशा सूचना मनपा अधिकाऱयांना केल्या होत्या. पण महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही.
परिणामी रस्त्याशेजारी फुटपाथ निर्माण करताच खोकी थाटण्यात येत आहेत. तसेच फेरीवाले व फळ विपेते व्यवसाय करीत आहेत. परिणामी पादचाऱयांना रस्त्यावरून ये-जा करावी लागते. एपीएमसीला जाणाऱया रस्त्याशेजारी असलेला फुटपाथ फळ विपेत्यांनीच ताब्यात घेतला आहे. त्यामुळे फुटपाथ नेमके कोणासाठी? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे मिलिटरी विनायक मंदिर ते कुवेंपुनगरला जाणाऱया हनुमाननगर येथील रस्त्याशेजारी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फुटपाथ, सायकल ट्रक निर्माण करण्यात आला आहे.
फेरीवाल्यांचे ठाण…
फुटपाथ तयार होताच या ठिकाणी रस्त्याशेजारी खोका आणून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खोकी थाटण्यासाठी व फेरीवाल्यांसाठी फुटपाथ निर्माण केले आहेत का? असा मुद्दा रहिवासी उपस्थित करीत आहेत. स्मार्ट रोड म्हणून कोटय़वधी रुपये खर्च करून रस्ते निर्माण करण्यात येत आहेत. मात्र याच ठिकाणी खोकी आणि फेरीवाले ठाण मांडत असल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तशी तरतूद आहे का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.









