कसाई गल्ली, कोनवाळ गल्ली बकरी शेड-स्लॉटर हाऊससाठी दुसऱयांदा बोली
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे आणि हॉल भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात येत आहे. याअंतर्गत सोमवार दि. 11 रोजी दुपारी एक वाजता विविध गाळय़ांसाठी मनपा कार्यालयात बोली लागणार आहे. जुना धारवाड रोड येथील पहिल्या मजल्यावरील हॉल, फिश मार्केटमधील गाळे, कसाई गल्ली आणि कोनवाळ गल्लीतील बकरी शेडचा समावेश आहे.
महापालिकेच्यावतीने विविध गाळे आणि हॉल भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. पण याकरिता संपूर्ण अनामत रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. धारवाड रोड येथील व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर असलेल्या अडीच हजार चौरस फूट आकाराचा हॉल भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून याकरिता प्रतिमाह 30 हजार रुपये भाडे व दहा लाख रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे दहा लाख रुपये अनामत रक्कम भरणा करून सहभागी होणार का, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
कसाई गल्ली परिसरातील फिश मार्केटमधील गाळय़ांना भाडेकरू मिळाले नव्हते. त्यामुळे आठ गाळय़ांसाठी लिलाव होणार असून 3000 हजार रुपये किमान भाडे व 50 हजार रुपये अनामत रक्कम मनपाने निश्चित केली आहे. तसेच कसाई व कोनवाळ गल्लीतील स्लॉटर हाऊस व बकरी शेड भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून दुसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सदर लिलाव मनपाच्या मुख्य कार्यालयात होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत अनामत रक्कम भरल्यास भाग घेता येणार आहे. सदर गाळे 12 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.









