31 जणांचा मृत्यू – 50 जणांना वाचवले ः मृतांमध्ये लष्करी
@ मनिला / वृत्तसंस्था
दक्षिण फिलिपाईन्समध्ये लष्कराचे एक विमान लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत 31 जणांचा मृत्यू झाला असून 50 जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी दिली. दुर्घटनेवेळी विमानात एकूण 96 जण प्रवास करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या विमानातील अनेक प्रवाशांनी नुकतेच प्राथमिक लष्करी प्रशिक्षण घेत पदवी संपादन केली होती. आता हे मुस्लीम-बहुसंख्य प्रदेशात दहशतवादाविरुद्ध लढा देण्याऱया संयुक्त टास्क फोर्सचा भाग म्हणून सेवेत दाखल होणार होते. या अपघातात काही जण जखमी असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
सी-130 विमान सुलू प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला जात असताना विमानाचा अपघात झाला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असताना या विमानाला आग लागली. या अपघातातून 50 जणांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र, विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच आग लागल्यामुळे 31 जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती लष्करप्रमुख सिरिलिटो सोबेजाना यांनी दिली. हा अपघात फार दुर्दैवी आहे. विमानाला धावपट्टीवर उतरताच आले नाही. विमान चालकाने पुन्हा विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो असफल झाला आणि विमान अपघात घडल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
लष्कराचे सी- 130 हे विमान सुलू प्रांतप्तील जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी विमानाचा भीषण अपघात होत विमानाला आग लागली. लष्कराचे हे विमान कागायन डी ओरो शहरातील सैन्याला घेऊन जात होते. परंतु धावपट्टी चुकल्याने या विमानाचे जोलो बेटावर लँडिंग करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानाने पेट घेतल्याने अपघातात मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेवर फिलिपाईन्सच्या सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी, ‘आम्ही अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत,’ अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. सशस्त्र दलाच्या प्रयत्नांमुळेच जवळपास 50 जणांना वाचविण्यात यश आले.









