फिर्यादी महिलेसह सहा जणांना अटक
प्रतिनिधी/ सातारा
पिंप्रद (ता. फलटण) येथे जमिनीच्या वादातून वृध्देचा झोपडीसह जाळल्याचा बनाव रचण्यात आला होता. पोलिसांनी कौशल्याने तपास करुन हा बनाव रचणाऱया फिर्यादी महिलेसह 6 जणांना अटक केली. या गुह्यात यापुर्वी अटकेत असलेल्या चौघांना फौजदारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुक्त करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघड करत या घटनेचा पर्दाफाश केला आहे.
झोपलेल्या वृद्धेचा जागेच्या वादातुन झोपडी पेटवून खून केल्याची फिर्याद सौ. कल्पना अशोक पवार (वय 45, रा. अलगुडेवाडी, ता.फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सासऱयाने खरेदी केलेल्या जागेच्या वादातून कुंडलिक कृष्णा भगत, सतीश भगत, राजु प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनिल मोरे या पाचजणांनी मारहाण करत वादग्रस्त झोपडी पेटवली. त्यात झोपलेल्या महुली उर्फ मौली या वृध्देचा जाळुन खून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले होते. फलटण पोलिसांनी खून व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला. कुंडलिक कृष्णा भगत, सतिश भगत, राजु प्रल्हाद मोरे व कुमार मच्छिंद्र मोरे या चौघांना अटक करण्यात आली होती.
या गुह्याचा अधिक तपास करताना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबात तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. त्यावरुन फिर्यादी कल्पना अशोक पवार व तिच्या कुटुंबातील अशोक झबझब पवार, (फिर्यादीचा पती व मयताचा भाऊ), ज्ञानेश्वर उर्फ कमांडो उर्फ किमाम अशोक पवार, गोपी अशोक पवार, काजल उर्फ नेकनूर पोपट पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोटय़ा काळे, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (सर्व रा. अलगुडेवाडी ता. फलटण) अशी खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
जागेच्या वादाचा विषय कायमचा निकालात काढण्यासाठीच यातील फिर्यादी व तिच्या कुटुंबियांनीच महुली उर्फ मौली या वृध्देच्या डोक्यात दगड घालून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ती अर्धमेली झाली असताना या कुटुंबियांनी स्वतःची राहती झोपडी जाळून खून केला. तसेच या सर्वाबाबत जागेचा वाद असलेल्या कुटुंबियांची नावे फिर्यादीत घेतल्याचे स्पष्ट झाले. या गुह्यात यातील मूळ फिर्यादी कल्पना अशोक पवार हिच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली असून आणखी काही संशयितांची लवकरच नावे निष्पन्न होतील, असे धीरज पाटील यांनी स्पष्ट केले.
या गुन्हय़ाचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, करत असून गुन्हय़ाचे तपासामध्ये आत्तापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर यापूर्वी खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जबरी चोरी, गर्दी मारामारी, दुखापत या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या पथकाने केला गुन्हा उघड
सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, ज्योतिराम बर्गे, तानाजी माने, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, रवि वाघमारे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ, वैभव सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, संकेत निकम, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, प्रविण अहिरे, महेश पवार, अनिकेत जाधव, संजय जाधव, पंकज बेसके, गणेश कचरे, विजय सावंत यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.








