ऑनलाईन टीम / नागपूर :
राज्य शासन तसेच नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपुरात स्पाइस हेल्थच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून 24 तासाच्या आत चाचणी अहवाल रुग्णांना मिळणार असून यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार करणे शक्य होतील आणि करोणा विषाणूचा संसर्ग टाळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात केेले.
कोविडड आरटी-पीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण आज स्थानिक कवीवर्य सुरेश भट सभागृहामध्ये गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी हा 12 तास करण्याचा सुद्धा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. सदर अहवाल हा मोबाईल वरच मिळणार असल्यामुळे प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही. नागपूर शहरासोबतच पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपुर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नमुन्यांची चाचणीसुद्धा येथील प्रयोगशाळेत होणार आहे. नागपूर शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता 200 वेटीलेंटर आले असून लवकरच 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा येणार असून या सर्वांच वितरण ग्रामीण विदर्भात होणार आहे .यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान कार्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटीच्या (सीएसआर) अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ऑक्सिजन प्रकल्पासाठी 15 कोटी रुपये देण्याचा अंतिम प्रस्ताव तयार झालेला आहे तसेच इतर 5 हॉस्पिटलला सुद्धा सीएसआर मधून हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प करण्यासाठी निधी देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या लॅबद्वारे 425 रूपयांत नमुने तपासले जाणार असून कंटनेरच्या आकारामध्ये असलेल्या या फिरत्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ चमू कार्यरत आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिदिन 3 हजार लोकांची टेस्ट केली जाणार असून त्याचा अहवाल 24 तासात मिळणार आहे. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा घेऊन ही लॅब नागपूरकरांच्या सेवेत आजपासुन दाखल झाली आहे.








