पिंपरी / प्रतिनिधी :
रस्त्याने विनाकारण फिरताना हटकल्याच्या रागातून पिंपरी-चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाला तिघा बाप-लेकांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. काळेवाडीत जामा मशिदीजवळ ही घटना घडली.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी युनूस गुलाब अत्तार (वय ५०), मतीन युनूस अत्तार (वय २८) आणि मोईन युनूस अत्तार (वय २४, सर्व रा. जामा मशिदीजवळ, भारतमाता चौक, काळेवाडी) या तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारा यातील एक आरोपी रेल्वेत पोलीस शिपाई आहे. पोलीस शिपाई शंकर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई कळकुटे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकात कार्यरत आहेत. ते सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते काळेवाडी परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, काळेवाडी येथील जामा मशिदीजवळ आरोपी युनूस अत्तार हे विनाकारण फिरत होते. पोलीस शिपाई कळकुटे यांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. या रागातून युनूस आणि त्यांची दोन मुले मतीन आणि मोईन यांनी कळकुटे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.









