वृत्तसंस्था/ झुरिच
गुरूवारी घोषित करण्यात आलेल्या फिफाच्या ताज्या मानांकन यादीत बेल्जियमने सलग तिसऱया वर्षअखेरीस अग्रस्थान पटकावत विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सला मागे टाकले आहे.
2019 च्या फुटबॉल हंगामात एकूण 1082 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळविले गेले. 1993 साली पहिल्यांदा फिफाच्या मानांकन पद्धतीला प्रारंभ करण्यात आला होता. 2020 च्या फुटबॉल हंगामामध्ये कोरोना महामारी समस्येमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ 352 सामने खेळविले गेले. 1987 नंतर वर्षभराच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या 2020 साली कमी झाली. मार्टिनेझच्या बेल्जियम संघाने चालू वर्षांमध्ये 8 पैकी 6 सामने जिंकून फिफाच्या मानांकनातील आपले अग्रस्थान मजबूत केले. तसेच बेल्जियमने पुढीलवर्षी होणाऱया युफाच्या नेशन्स लीग अंतिम स्पर्धेत आपले स्थान आरक्षित केले आहे.
फिफाच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या चार क्रमांकामध्ये कोणताही फेरबदल झालेला नाही. बेल्जियम पहिल्या, फ्रान्स दुसऱया, ब्राझील तिसऱया, इंग्लंड चौथ्या, पोर्तुगाल पाचव्या, स्पेन सहाव्या, अर्जेंटिना सातव्या, उरूग्वे आठव्या, मेक्स्को नवव्या आणि इटली दहाव्या स्थानावर आहे.









