वृत्तसंस्था/ लॉसेन
फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांच्या कारकिर्दीत फिफाचे अर्थ विभागाचे संचालक व कार्यकारी सरचिटणीस म्हणून काम पाहिलेले जर्मनीचे मार्कस कॅटनर यांच्यावर फिफाने दहा वर्षांची बंदी घातली आहे. यामुळे फुटबॉलशी संबंधित कोणत्याही कार्यात ते आता भाग घेऊ शकणार नाहीत. बंदीबरोबरच त्यांना 10 लाख स्विस प्रँक्सचा (1.056 दशलक्ष डॉलर्स) दंडही करण्यात आला आहे.
व्यावसायिक हितसंबंधात बाधा आणल्याप्रकरणी तसेच पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर फिफाच्या एथिक्स समितीने ही कारवाई केली आहे. 2016 मध्ये कॅटनर, माजी अध्यक्ष ब्लॅटर व माजी सरचिटणीस जेरोम व्हॅके यांच्या घोटय़ाळांची चौकशी सुरू करण्यात आली होती. पाच वर्षांच्या कालावधीत या तिघांनी मिळून 80 दशलक्ष डॉलर्सहून अधिक रकमेचा अपहार केला होता. ब्लॅटर व व्हॅके यांच्यावर याआधीच बंदी घालण्यात आली आहे.









