अनोखा पुढाकार- हिमवृष्टीत ये-जा करण्यास मदत होणार
जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक असलेल्या फिनलंडमध्ये हिमवृष्टीमुळे लोकांना कामावर जाण्यास अडचण येते. याचाच विचार करून तेथे आता अनोखा पुढाकार घेण्यात आला आहे. लहती शहरात आता ‘स्की शेयरिंग’ सेवेद्वारे यावर तोडगा काढण्यात आला आहे. स्की म्हणजे बर्फावर चालणारे उपकरण. लहती शहरायत या सेवेच्या अंतर्गत लोक सायकलप्रमाणेच घराच्या नजीकच्या स्टँडमधून स्की प्राप्त करू शकतात. स्कीद्वारे कार्यालयात पोहोचून तेथील स्टँडवर ती सोडू शकतात.
आरोग्यही उत्तम राहणार
या सुविधेमुळे बर्फात रेंगाळत चालणाऱया वाहनांपासून मुक्ती मिळणार आहे. काहीतरी नवे करण्याच्या इच्छेतून शहरात एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाण्यासाठी टिकावू पर्यायावर काम केले आहे. स्कीच्या माध्यमातून प्रवास करताना लोकांचे आरोग्यही उत्तम राहणार आहे. तसेच हिमवृष्ठीदरम्यान स्वस्त आणि टिकावू सेवाही मिळणार असल्याचे उद्गार प्रकल्पाच्या व्यवस्थापिका एना हटन यांनी काढले आहेत.
स्की सुविधा सध्या तात्पुरती
वाहतुकीत सुलभता आणि कर्बवायू उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने यातून यश मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार स्की सुविधा सध्या तात्पुरती आहे. पण अशा अनेक प्रयोगांमुळेच लहतीला मागील वर्षी युरोपमधील ‘ग्रीन कॅपिटल ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला होता. 2025 पर्यंत कर्बवायू उत्सर्जन शून करणे लहती शहराच्या प्राथमिक लक्ष्यांमध्ये सामील आहे.
कार न वापरण्याचे आवाहन
राजधानी हेलसिंकीपासून अर्ध्या तासाच्या प्रवासावर असलेल्या या उपनगरात स्की सेवेचा लाभ घेण्यासाठी लोक आता स्कीइंगचे प्रशिक्षण घेत आहेत. हिमवृष्टीत कारचा वापर लोकांनी करू नये. स्कीइंग सायकल चालविण्याइतकेच सोपे आहे. सरावानंतर कार्यालयात पोहोचण्याचे रोमांचक साधन ठरू शकते असे शहराच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.









