घुणकी / वार्ताहर
महामार्गावरील टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी १ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून फास्टॅग (fastag) अनिवार्य होणार होते पण त्याची १५ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवली आहे. मात्र फास्टॅग नसणारे वाहन फास्टॅग लेनमध्ये आल्यास दुप्पट टोल भरावा लागल्याने बऱ्याच वेळा वादावादी होत असल्याचे चित्र किणी टोल नाक्यावर दिसत आहे.
फास्टॅगविषयी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच टोल नाक्यावरही फास्टॅग असणाऱ्या वाहनांसाठी वेगळ्या रांगा व कॅशसाठी वेगळ्या रांगा ठेवल्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत होत आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्याचा सोपा उपाय म्हणून फास्टॅगकडे पाहिले जात आहे. मात्र आता राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाके फास्टॅग करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने १ जानेवारी फास्टॅग सक्तीसाठी निवडली, मात्र पुन्हा ही मुदत १५ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे वाहनांसाठी सहा रंगा व फास्टॅग नसणाऱ्या वाहनांसाठी दोन रांगा ठेवण्यात आल्या आहेत. फास्टॅग नसणारे वाहन फास्टॅगच्या लेनमध्ये आल्यास त्यांचेकडून दुप्पट टोल वसूल करण्याच्या सूचना शासनाने दिल्याने त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्यानंतर वाहनधारक व टोल कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत.








