निर्भया प्रकरण : न्यायालयाकडून नवे डेथ वॉरंट : राष्ट्रपतींनी दयायाचिका फेटाळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील बहुचर्चित निर्भया बलात्कार प्रकरणात दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. यासंदर्भात दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयाने नवे डेथ वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या डेथ वॉरंटनुसार 22 जानेवारीला निर्भयाच्या दोषींना फाशी ठोठावण्यात येणार होती. मात्र, डेथ वॉरंटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबरोबरच अन्य काही कायदेशीर अडचणी आल्यामुळे 22 तारीखचे डेथ वॉरंट रद्द करण्यात आले होते.
निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश कुमार याने राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला आहे. दोषी मुकेशने ही याचिका मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपतींना पाठवली होती. याप्रकरणी जर इतर तिघांनी दया याचिका दाखल केली नाही, तर 14 दिवसानंतर त्यांना फाशी दिली जाईल. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. त्यामुळे आता निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 22 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. मात्र, यातही काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यास ही 1 फेबुवारी ही तारीखही लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘निर्भया’च्या आईची नाराजी
फाशीला उशीर होत असल्याने निर्भयाच्या आईने नाराजी व्यक्त केली आहे. दोषींच्या सोयीनुसार सर्व काही केले जात आहे. आपल्या न्यायव्यवस्थेत दोषींचे म्हणणे जास्त ऐकले जाते. दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, तारीख पे तारीख नको, अशी स्पष्टोक्ती निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.
अंमलबजावणी आणखी लांबण्याचीही शक्यता
दिल्ली प्रिजन मॅनुअलच्या 837 व्या पॉइंटनुसार, जर एकाच प्रकरणात एकापेक्षा अधिक लोकांना फाशीची शिक्षा मिळाली असेल आणि यापैकी एकानेही दयेचा अर्ज दाखल केला तर सर्वांची फाशी ठराविक कालावधीसाठी थांबवली जाते. अशा परिस्थितीत चारही आरोपींपैकी एकानेही दयेचा अर्ज दाखल केला, तर सर्वांची फाशी लांबवणीवर जाऊ शकते. मात्र, आरोपींपैकी एकानेही दयेचा अर्ज दाखल केला नाही, तर डेथ वॉरंट बजावल्यानंतर 14 दिवसात त्यांना फाशी दिली जाऊ शकते.









