एकेकाला फाशी देण्याची मागणी : निर्भया प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय सुरक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांच्या फाशीला स्थगिती देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद सरकारने सादर केलेल्या अपीलावर दिल्ली उच्च न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. हा निर्णय सोमवारी घोषित होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील गुन्हेगार फाशी टाळण्यासाठी कायद्यातील पळवाटांचा गैरवापर करीत आहेत, असे युक्तीवाद सरकारने केला.
दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने चारही गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता. त्याविरोधात केंद्राने उच्च न्यायालयात अपील करत एकेका आरोपीला फाशी देण्याचा युक्तिवाद केला. त्यावर रविवार सुटीचा दिवस असूनही सुनावणी करण्यात आली. अधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. गुन्हेगारांनी थंड डोक्याने कायद्यातील पळवाटा शोधून स्वतःचा मृत्यू लांबविण्याचे कारस्थान केल्याचा त्यांनी आरोप केला. गुन्हेगार कायद्याशी खेळत असून त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणातील एक गुन्हेगार पवन गुप्ता याने जाणूनबुजून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केलेला नाही. असा अर्ज सादर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही असे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश कैत कोणता निर्णय देतात याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.









