निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने चारही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा कायम केली आहे. या चौघांना डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारीला ही फाशी दिली जाणार आहे. कायद्याचा धाक आणि गुन्हेगारांना त्यांच्या क्रूर कृत्यांची शिक्षा मिळते याचे समाधान आहे. या शिक्षेचे अनेकांनी स्वागत केले आहे. मध्यंतरी अशाच प्रकरणात पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचेही लोकांनी स्वागत केले होते. 22 जानेवारीला फाशीच्या शिक्षेचे देश-विदेशात थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करावे, अशी मागणी ‘परी’ या संघटनेने केली आहे. अन्य काही आक्रमक संघटनाही या मागणीला दुजोरा देत आहेत. ‘पीपल्स अगेन्स्ट रेप इन इंडिया’ असे परी या संघटनेचा नाम विस्तार आहे. या संघटनेने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून मागणीचे निवेदन दिले आहे. कायद्याचा धाक आणि स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार या विरोधी वचक निर्माण व्हावा यासाठी 22 जानेवारीला या चौघांना फाशी देताना दूरचित्रवाणीवर थेट दाखवा, अशी मागणी संघटनेची आहे. अर्थातच ती कायद्याला व न्यायाला धरून नाही. भारत म्हणजे इराक नव्हे. हा महात्मा गांधींचा, गौतम बुद्धांचा देश आहे. कायदा-सुव्यवस्था काहीवेळा खालावली, महिलांवर अत्याचार झाले, बलात्कार झाले हे मान्य करुनही ‘आरोपींना फाशी देताना थेट प्रक्षेपण करा‘ अशी मागणी होणे गंभीर आहे. आपली मानसिकता, विचारशक्ती, विवेकबुद्धी कोणत्या दिशेने वाटचाल करते याचे ते निदर्शक आहे. जगात काही देशात अशी शिक्षा देतात हे खरे असले तरी तो आदर्श नाही. इराक किंवा आखातामध्ये काही देशात आरोपींना भर चौकात वधस्तंभाला बांधून लोकांसमोर रक्तबंबाळ पेले जाते. चाबकांचे फटके मारले जातात आणि जल्हाद त्यांना लाखो लोकांसमोर फाशी देतो. जशास तसे हा तेथील शिक्षेचा आधार आहे. चोरी केली, हात तोडा, डोळे मिचकवले डोळे फेडा, बलात्कार केला, फाशी द्या असा तेथे न्याय आहे. पण, प्रगत देशात तो मान्य नाही. भारतात काही वर्षापूर्वी फाशी असावी की नसावी यावर चर्चा सुरू होती. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हा हिंदुस्थानचा संस्कार आहे आणि माणूस वाईट नसतो, त्याची कृती वाईट असते असे म्हटले जाते आणि सुधारण्याची संधी दिली पाहिजे अशी त्यामागे भूमिका असते. हिंदीत व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारा हाथ’ नावाचा चित्रपट आला होता. गंभीर गुह्यातील गुन्हेगार कसे सुधारतात असे हा सिनेमा सांगतो. पूर्वीच्या औंध संस्थानात खुल्या कारागृहाचा हा प्रयोग झाला होता आणि आजही ते खुले कारागृह आटपाडीजवळ आहे. आपली संस्कृती, परंपरा, अध्यात्म, संत साहित्य हेच सांगते की संस्कार चांगले झाले पाहिजेत. पण, संस्कारावर भर न देता शिक्षेवर, शिक्षेच्या प्रदर्शनावर भर द्यावा असा विचार पुढे येताना दिसतो आहे. तो सर्वस्वी चुकीचा आहे. लोकांना कायद्याचा धाक हवाच. जोडीला कायदा-सुव्यवस्था चांगली रहावी, न्यायव्यवस्था गतिमान आणि परिणामकारक व्हावी अशी अपेक्षा असते. पण आज त्यामध्ये फारसे समाधान नाही. कालपर्यंत गुह्यात जेलबंद असलेले एका क्षणात कुठे-कुठे अधिकारपदावर बसतात, सत्ता-अधिकार, सन्मान मिळवतात त्यामुळे मती खुंटून जाते. एकीकडे ही कायदा-न्याय यांची अवस्था तर दुसरीकडे संस्काराचे आद्य पीठ म्हणून गणली जाणारी कुटुंब व्यवस्थाच अडचणीत येत असलेली. शाळातून मूल्यशिक्षण सारखे विषय असले तरी त्यांची अंमलबजावणी चिंतेचा विषय. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ येथील वातावरण तर न बोललेलेच बरे. भागवत धर्म, संत परंपरा म्हटले तरी पंढरपुरात मठाधीश वादातून महाराजाचा खून अशी घटना समोर येते आणि भगव्या, हिरव्या, पांढऱया कपडय़ातील साधू-संधीसाधू बुवांच्या कथा रोज समोर येतात. एकूणच नैतिकता घसरते आहे. कायदा-सुव्यवस्था अडचणीत आहे आणि सोशल मीडियावर अशा घटना रोज लोकांसमोर येत असल्या तरी जग हे या घटनांवर किंवा या गुन्हेगारांवर चाललेले नाही. समाजात चांगुलपणा आणि सद्प्रवृत्ती शिल्लक आहेत त्यामुळेच हे जग उभे आहे. खरे तर प्रकाश जावडेकर यांनी ही मागणी जागेवरच फेटाळायला हवी होती. या संघटनेला कायदा, नियम सांगायला हवा होता. पण असे काही केले तरी अंगावर येणार आणि ट्रोल होणार त्यामुळे काही निर्णय घेण्यास अनेक मंडळी कचरतात. पण, न्याय-अन्यायाचा निर्णय असो किंवा व्यापक समाजहित, मानवहिताचा निर्णय असो तो प्रसंगी विरोध पत्करूनही राबवला पाहिजे. त्यातच हित आहे. एककाळ असा होता की भारतात फाशी देणारे जे जल्हाद असतात त्यांची कमतरता होती. कुणी उरले नव्हते. पण आज तसे नाही. गुन्हेगाराला कठोर शासन झाले पाहिजे. न्याय विनाविलंब मिळाला पाहिजे आणि कायदा-सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. हे शंभर टक्के सत्य असले तरी त्यांचा पाया संस्कार हा आहे, लाईव्ह प्रक्षेपण नाही हे समजून घेतले पाहिजे. किती जणांची फाशी तुम्ही लाईव्ह दाखवणार आणि ती बघून कुणाकुणावर काय परिणाम होणार, याचा विचार केला पाहिजे. रक्त बघूनही चक्कर येते असे अनेक नागरिक भारतात आहेत. कुणाला कधी चिमटा काढला नाही असे सांगणारे अनेक आहेत. या देशात असा विचार आणि मागणी होणे हे गंभीर आहे. प्रसिद्धी स्टंट किंवा एखाद्या घटनेविरोधी संताप समजू शकतो पण आपण आपल्या मूल्यावर, उच्च संस्कारावर ठाम असायला हवे. गुह्याचे, गुन्हेगारांचे शिक्षेचे प्रदर्शन होता कामा नये. यावर भर देताना चांगल्या समाज निर्मितीसाठी, उत्तम प्रशासनासाठी, आदर्श लोकप्रतिनिधी व संघटनासाठी आग्रह धरला पाहिजे. चांगल्या गोष्टींना, विचारांना, व्यक्तींना, संघटनांना पाठबळ दिले पाहिजे आणि चुकीचे काही घडत असेल, घडणार असेल तर त्यावर प्रहार केला पाहिजे. त्यातच सार्वहित आहे. समाज सुधारणाचे कोणतेही बटण नसते. एक बटण दाबले आणि जग सुधारले असे होत नाही. त्यासाठी सातत्याने आणि सर्व स्तरावर प्रयत्न गरजेचे असतात. संस्काराची शिदोरी बळकट ठेवावी लागते. आज जो काळ आला आहे तो ही शिदोरी डळमळीत झाल्याचा परिणाम आहे. फाशीचे थेट प्रक्षेपण नको. संस्काराचे घरोघरी, शाळा-शाळात, गावा-गावात विद्यापीठ हवे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि ‘परी’सह सर्वांनी त्यासाठी पावले टाकली पाहिजेत.








