काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले : काँग्रेसवर चढविला जोरदार हल्ला
प्रतिनिधी /पणजी
अपेक्षेनुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार लुईझिन फालेरो यांनी सोमवारी आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सादर केला. त्यानंतर दुपारी त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आज मंगळवारी सकाळी ते कोलकातासाठी रवाना होत असून तृणमूल काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश करणार आहेत. शक्यतो शुक्रवारी ते कोलकाता येथूनच राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
केवळ एका ओळीचा राजीनामा सभापतींकडे सादर केल्यानंतर सायंकाळी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष आणि पदत्यागामागील कारणे स्पष्ट केली. आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरीही अद्याप काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. आजही काँग्रेसमनच आहे. तृणमूलमध्ये प्रवेशासंबंधी लवकरच निर्णय घेणार असून पुढील विधानसभा निवडणूक लढविणार की नाही तेही अद्याप निश्चित नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेस शाखांना एकत्र आणणार
आपला लढा काँग्रेसशी नसून शत्रु असलेल्या भाजपशी आहे. त्यासाठी काँग्रेसच्या शाखा असलेल्या अन्य विविध पक्षांना एकत्र आणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. व्यासपीठावर त्यावेळी काँग्रेस प्रवक्ते ऍड. यतीश नाईक, विजय पै, आदींची उपस्थिती होती.
आज आपला गोवा गुदमरतोय
प्रशासनातील गैरकारभार, चुकीची धोरणे यामुळे आज गोवा गुदमरत आहे. मात्र तुमच्या आमच्यासारखे लोक गोव्याची अशी परिस्थिती होऊ देणार नाहीत. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत गोवा आणि गोमंतकीयांसाठी अनेक योजना, कार्यक्रम राबविले. अनेक जुन्या, नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती केली. राज्याचे पर्यावरण सांभाळणे, रोजगारात स्थानिकांना 80 टक्के आरक्षण, आदींसाठी नवीन कायदे आणले, असे ते म्हणाले.
विभाजित काँग्रेसला एकत्र आणण्याची गरज
काँग्रेस हा केवळ एक पक्ष नव्हे, आमच्या राष्ट्रपित्यांनी सुरू केलेली ती एक चळवळ आहे. पक्षाची ध्येयधोरणे, तत्वज्ञान, तसेच काँग्रेसने आतापर्यंत देशासाठी दिलेल्या योगदानाचा मी आदर करतो, असे ते म्हणाले. परंतु आता ममता काँग्रेस, व्हायएसआर काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, आणि अखिल भारतीय काँग्रेस, अशा विविध शाखांद्वारे काँग्रेस कुटुंब विभाजित झाले आहे. हे सर्व पक्ष एकत्र आले पाहिजेत. त्याचबरोबर भाजपाशी लढा देण्यात यशस्वी झालेल्या नेत्यांनाही एकत्र आणण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत सर्व समविचारी नेत्यांना एकत्र आणणे हे आपले स्वप्न आहे, असे फालेरो म्हणाले.
गोव्याला आज सक्षम बदल हवा आहे. राजीनामा सादर करून आपण नवी सुरुवात केली आहे. भाजपला हरविण्यासाठी तमाम गोमंतकीयांनी एकत्र यावे व जाती धर्माच्या नावाने राजकारण करून गोमंतकीयांमध्ये फूट घालणाऱया भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन फालेरो यांनी केले.
अदानी, जिंदाल यांच्या इशाऱयांवर नाचणाऱया सरकारने आज गोवा कोळसा हब बनविले आहे. 11 दशलक्ष कोळसा आणण्याची त्यांना परवानगी देण्यात आली आहे. 60 टक्के लोकांची जीवनदायीनी असलेली म्हादई नदी कर्नाटकास विकली आहे. खानिज व्यवहारातील 35 हजार कोटींची लूट वसूल करून घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही हे सरकार काहीच करत नाही. असे प्रशासन गोमंतकीयांचे आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
मासळी माफियांना दिली मान्यता
फॉर्मेलीनयुक्त मासळी आयातीकडे डोळेझाक करून एकप्रकारे मासळी माफियांना मान्यताच देण्यात आली होती. परिणामी रोज लाखो लोकांवर अप्रत्यक्ष विषप्रयोगच करण्यात येत होते. त्यातून कर्करोग झाल्यामुळे हजारो गोमंतकीयांचे बळी गेले. लोकांनी आंदोलने केली, त्यानंतर सरकारने फॉर्मेलिन तपासणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु आजपर्यंतच त्याची पूर्तताच झालेली नाही, असे आरोप त्यांनी केले.
तत्कालीन गोवा प्रभारींनी मोडता घातला…
काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत होती का? असे विचारले असता, 2017 च्या निवडणुकीत मतदारांनी तब्बल 17 आमदार निवडून दिले होते. त्याशिवाय हाती अन्य एक आमदार होता. सरकार स्थापन करण्याची चांगली संधी होती. दिल्लीतून होकारही मिळाला होता. त्यानुसार राज्यपालांना पत्र देणे तेवढे बाकी होते. परंतु तत्कालीन गोवा प्रभारींनी मोडता घातला. त्यानंतर जे घडले तो इतिहास होता. ज्या मतदारांनी अत्यंत विश्वासाने काँग्रेससाठी मतदान केले त्यांचा एकप्रकारे हा अपमानच होता. हे शल्य कायम मनात होते. त्यातून मनाला यातना होत होत्या, तरीही गत साडेचार वर्षे मौन बाळगून राहिलो, असे सांगत फालेरो यांनी आपल्या घुसमटीमागील कारण स्पष्ट केले.
विधानसभेचे संख्याबळ 39 : दिगंबर कामतांचे विरोधी पक्षनेतेपद टिकून
लुईझिन फालेरो यांनी आमदारकिचा राजीनामा दिल्याने गोवा राज्य विधानसभेतील आमदारांची संख्या आता 39 झाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे संख्याबळ इ.स. 2001 नंतर प्रथमच एवढे निचांक पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान दिगंबर कामत यांचे विरोधी पक्षनेतेपद शाबूत राहिले आहे.
विधिमंडळात प्रमुख विरोधी पक्षाचे संख्याबळ एकदम कमी झाले तर साहजिकच विरोधी पक्षनेते पद जाते. तथापि, विधानसभेचे संख्याबळ, एकाने कमी झाल्याने काँग्रेस नेते दिगंबर कामत यांचे नेतेपद कायम राहिले आहे. त्यांच्या पदास धोका पोहोचत नाही, नेतेपद कायम राहिले आहे. मात्र आणखी एका आमदाराने राजीनामा दिला तर मग दिगंबर कामत यांचे पद जाईल. तशीच परिस्थिती आणण्यासाठी भाजपने काँग्रेसमधील एका आमदारला फोडून आण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.









