नव्या औषधांचे प्रमाण 3 टक्के वाढले : गरजेची महत्त्वाची औषधे महागली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधांच्या मागणीने वाढ दर्शवल्याने फार्मा क्षेत्राची सप्टेंबरमध्ये साडेचार टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत याच महिन्यात फार्मा उद्योगाची वरीलप्रमाणे वाढ झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
फार्मा किंवा औषध क्षेत्राने मागच्या वषी सप्टेंबरमध्ये 11.9 टक्के इतकी व्यवसायात वाढ दर्शवली होती. यंदा नव्या औषधांचे बाजारात दाखल होण्याचे प्रमाणही 3.8 टक्के इतके वाढले आहे. हृदयविकारासाठी लागणाऱया औषधांच्या मागणीमध्ये जवळपास 17 टक्के वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. विटामिन, मिनरल्स आणि न्यूटिंन्सशी संबंधीतच्या औषध, उत्पादनांच्या विक्रीमध्ये 16 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. त्याचप्रमाणे मधुमेहाशी संबंधित आजारावरील औषधांच्या विक्रीतही 6.5 टक्के इतकी मागच्या महिन्याच्या तुलनेत वाढ दिसली आहे. ऑगस्टमध्ये 2.2 इतकी घट दर्शविल्यानंतर सप्टेंबरमध्ये औषधांची मागणी वाढली आहे. कोरोनाशी संबंधित औषधांच्या विक्रीतही चांगली वाढ दिसली आहे.
गरजेची औषधे महाग, निर्यातही वाढली
गरजेच्या औषधांच्या किमतीमध्ये दरम्यानच्या काळात 3.6 टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसले आहे. क्रीसिलच्या अंदाजानुसार फार्मा निर्यातीने या आर्थिक वर्षात 11 ते 12 टक्के इतकी वाढ दर्शविली असल्याचे सांगितले आहे. मागच्या वषीच्या तुलनेमध्ये ही वाढ 10 टक्के अधिक आहे. विशेषत: कोरोनासंबंधीत प्रतिकारशक्ती वाढवणाऱया औषधांसह इतर औषधांचा वाटा निर्यातीत अधिक राहिला आहे.









