आज संपूर्ण जगाला भंडावून सोडणारा आजार म्हणजे कोरोना. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक भारतीय केंद्र आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या कायदे व नियमांच्या चौकटीत राहून आपला हातभार लावत आहे. या सर्व प्रक्रिये मध्ये बाधित रुग्णाच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून घेतलेल्या आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक सेवकास देवदूत म्हणावे लागेल. आरोग्यव्यवस्था म्हटली की डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी हे तीन आरोग्य स्तंभ पटकन डोळय़ासमोर येतात. परंतु या तीन स्तंभांना भक्कम आधार देणारा चौथा स्तंभ म्हणजे ‘फार्मासिस्ट’. विशेष म्हणजे तो कधीच चर्चेत नसतो. हरकत नाही, परंतु त्यालादेखील आज प्रोत्साहनाची गरज आहे. किंबहुना पहिल्या तीन स्तंभांच्या बरोबरीने जोखीम पत्करत हा चौथा स्तंभ काम करत आहे. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे, जर हा चौथा स्तंभ नसेल तर आरोग्य व्यवस्थेची ही इमारत उभी राहू शकेल का?
आज भारतातील फार्मासिस्ट आरोग्यसेवेच्या विविध स्तरावर सेवा प्रदान करत आहेत. फार्मासिस्ट प्रमुख्याने चार विभागांमध्ये विभागले आहेत. हॉस्पिटल फार्मासिस्ट, खासगी क्षेत्रात काम करणारे फार्मासिस्ट (कम्युनिटी फार्मासिस्ट, फार्मसी क्षेत्रातील शिक्षक), फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे फार्मासिस्ट, आणि फार्मास्युटिकल वितरण व्यवस्था होलसेलर. फार्मासिस्ट म्हणजे फक्त औषध दुकानदार नव्हे, तर संशोधन क्षेत्रातही फार्मासिस्टचे खूप मोठे योगदान आहे. म्हणूनच दुर्धर समजल्या जाणाऱया विविध आजारावरील औषधांचेदेखील भारतात यशस्वी संशोधन होत आहे, हे प्रामुख्याने ध्यानात घेतले पाहिजे.
याबरोबरच पडद्यामागील अनेक कार्यक्षेत्रे भारताच्या आरोग्य क्षेत्रातील प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आज मी प्रामुख्याने हॉस्पिटल फार्मासिस्ट, खासगी क्षेत्रात काम करणारे फार्मासिस्ट (रिटेल/कम्युनिटी फार्मासिस्ट) आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे फार्मासिस्ट आणि फार्मास्युटिकल वितरण व्यवस्था-औषध वितरक/होलसेलर याबाबत सध्याची परिस्थिती आपल्यापर्यंत पोचवणार आहे. भारतात सरकारी दवाखाने आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्यसेवा घेण्याकरिता सर्वसामान्य जनतेचा कल अधिक असतो. त्याप्रमाणे त्यांना उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा व उपचार प्रदान केले जातात. या आरोग्य केंद्रास दिवसा किमान 500-600 रुग्ण भेट देतात. गमतीचा भाग म्हणजे हे रुग्ण डॉक्टरपेक्षा जास्त वेळ औषध देणाऱया फार्मासिस्टच्या खिडकीत येऊन बोलतात आणि प्रश्न विचारतात. कारण एकच ते म्हणजे आपलेपणाची जाणीव व कोणतेही दडपण बाळगण्याची स्थिती नाही. परंतु औषध वितरित करणाऱया या फार्मासिस्टची हॉस्पिटलचे मेडिसिन स्टोअर मॅनेजमेंट करताना होणारी धडपड नेहमी पडद्यामागेच राहते. सरकारी दवाखान्यामध्ये शासनाद्वारे नियुक्त केलेल्या वितरकाद्वारे औषधांचा पुरवठा सुनिश्चित कालावधीमध्ये होत असतो. परंतु एखाद्या वेळेस एखाद्या औषधाचा तुटवडा भासल्यास तेथे रुजू असलेला औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) इतर औषध वितरक कंपन्यांशी बोलून त्याचे दर योग्य किमतीच्या चौकटीत बसवतो. ती औषधे हॉस्पिटलमधील फार्मसी रॅकवर आणून साठवेपर्यंत कार्यरत असतो. आजच्या स्थितीत सरकारी दवाखान्यात एकटा फार्मासिस्ट औषध वितरण व स्टोअर मॅनेजमेंट ही दोन्ही कामे करत आहे. किमान या महामारीच्या काळात शासकीय दवाखान्यात कार्यरत फार्मासिस्टच्या मदतीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. याकरिता शासनाने तात्काळ सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी व काही फार्मासिस्टना कंत्राटी तत्त्वावर रुजू केल्यास अधिक उत्तम रुग्णसेवा प्रदान करता येईल.
देशात नोंदणीकृत फार्मासिस्टचा विक्रमी आकडा (2,55,000 पेक्षा जास्त) महाराष्ट्रात आहे. आज कोरोना महामारीच्या काळात या आजाराची लागण होण्याच्या धोक्मयास ज्याप्रकारे डॉक्टर, नर्स व आरोग्यसेवक सामोरे जात आहेत, तेवढाच धोका सरकारी विभागात कार्यरत फार्मासिस्ट पत्करत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना वैयक्तिक संरक्षण संच (Personal Protection Kit), हॅण्डग्लोज, सॅनिटायजर, हँडवॉश आणि एन 95 मास्कचा योग्य पुरवठा होणे अपेक्षित आहे.
रिटेलर केमिस्ट कम्युनिटी फार्मासिस्ट हा आपल्या आरोग्य व्यवस्थेतील असा एक घटक आहे, ज्याच्याकडे आपल्या घरातील लोक डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आवर्जून जातात आणि लक्षणे सांगून औषधांची मागणी करतात. अशावेळी फार्मासिस्ट आपण सांगितलेल्या लक्षणांची तीव्रता व प्रकार लक्षात घेऊन, योग्य असल्यास ओटीसी विभागातील औषधे देतो अथवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे पटवून देतो. कोरोना महामारीत रिटेल केमिस्ट/कम्युनिटी फार्मासिस्टची वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग (किमान सुरक्षित अंतर 1 मीटर) चे काटेकोर पालन करत अतिशय कौशल्याने नियमित व जीवनावश्यक औषधे पुरविताना कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्याचा चालू असलेला आणि यशस्वी ठरलेला प्रयत्न. स्टे होम, स्टे सेफ (घरी रहा-सुरक्षित रहा)या विचाराला अनुसरून बऱयाच फार्मासिस्टने तुम्ही घरी थांबा, आम्ही योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेऊन तुमच्या घरी औषधे पोहचवतो, असे आपल्या ग्राहकांना बजावले आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्ण व ग्राहकाची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून सतर्क असताना फार्मसीतील कर्मचारी वर्गाच्या आरोग्याची व सुरक्षेची घरातील वडीलधाऱया माणसाप्रमाणे फार्मासिस्ट काळजी घेत आहेत. परंतु एवढी काळजी घेऊनही रिटेल केमिस्ट/कम्युनिटी फार्मासिस्टला कोरोनाचा संक्रमण होण्याचा धोका नाकारता येत नाही. शासनाद्वारे येणाऱया प्रत्येक नियम कायदा-सूचनांचे स्वागत आहे. परंतु अत्यावश्यक सेवा पुरवत असताना एकाच दिवसात फार्मसी बंद करण्याचे आणि बंद केल्यास त्वरित चालू करण्याचे, असे दोन आदेश येतात. त्यामुळे हा संभ्रम टाळण्यासाठी विशेष उपाययोजना व निर्णयांची आवश्यकता आहे. कारण औषध ही अत्यावश्यक सेवा कोरोना महामारीतदेखील अखंडित पुरविण्यास आम्ही बांधील आहोत. तसेच रिटेल केमिस्ट/कम्युनिटी फार्मासिस्टचा कोरोना प्रतिबंधात्मक जनजागरण व समुपदेशनाकरिता उपयोग होत आहे व पुढेही होत राहील. औषध वितरक/होलसेलर हा आरोग्यव्यस्थेचा असा घटक आहे, ज्याची याआधी कधीच नोंद घेतली गेली नाही. परंतु सद्यस्थितीत जनतेकडून गरज नसताना डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदय विकार आणि अस्थमासारख्या बराच काळ उपचार चालू राहणाऱया औषधांची भरपूर खरेदी करून साठवणूक होत आहे. यामुळे औषधांचा होणारा तुटवडा, संचारबंदीमुळे मोडकळलेली औषध वाहतूक सेवा, शासनाला वेळोवेळी द्यावे लागणारे औषधांचे अवक-जावक अहवाल, सोबतच अपुरा कर्मचारी वर्ग, या सर्व समस्यांना ‘वन मॅन आर्मी’ प्रमाणे वितरक/होलसेलर सामोरे जाऊन आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत. ही गोष्ट विशेष दखलपात्र आहे, म्हणून त्यांच्याही समस्या सरकारने जाणून घ्याव्यात ही अपेक्षा आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील फार्मासिस्ट म्हणजे औषधाचा जनक व निर्माता. जर नवनवीन औषधांची निर्मिती झालीच नाही, तर अनेक दुर्धर आजार समाजाला ग्रासतील, या भावनेने तो नेहमी काहीतरी नवीन व सर्वसामान्यांना परवडेल अशी औषधे निमार्ण करत असतो. फार्माइंडस्ट्रीतून येणाऱया जीवनावश्यक वस्तूंची व औषधाची कोठेही साठेबाजी होऊ नये आणि निकृष्ट दर्जाची औषधे व संसर्ग प्रतिबंधाचे घटक बाजारात येऊ नयेत, याकरिता अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी डोळय़ात तेल घालून उत्पादन ते वितरण यातील प्रत्येक टप्प्यांचे निरीक्षण व मूल्यांकन करत आहेत. एकूणच कोरोनाने संपूर्ण जगात संचारबंदी आणली. परंतु फार्मसी क्षेत्रात कार्यरत फार्मासिस्टच्या कार्याला हा कोरोना विषाणू थांबवू शकला नाही. फार्मासिस्ट या आधीही याच तत्परतेने व निस्वार्थपणे आरोग्यसेवेत काम करत होता, करत आहे आणि पुढे करत राहील. म्हणूनच शासन व सर्वसामान्यांद्वारे फार्मासिस्टच्या या योगदानाचे कौतुक करावे, हे अपेक्षित नसले तरी इतिहासात आरोग्य व्यवस्थेने कोरोनावर मात करण्यासाठी दिलेल्या लढय़ात फार्मासिस्टच्या कार्याची नोंद मात्र जरूर ठेवावी.
विजय पाटील, फार्मासिस्ट
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद








