वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या घोटाळय़ाप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या अंतर्गत फारुख अब्दुल्ला आणि इतरांची 11.86 कोटी रुपयांच्या मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने अब्दुल्ला यांची 3 घरेही जप्त केली आहेत. यातील एक घर गुपकार रोड दुसरे कटिपोरा, तन्मर्ग आणि तिसरे भटंडी जम्मू येथे आहे. याचबरोबर या घोटाळय़ाप्रकरणी 3 भूखंडही गोठविण्यात आले आहेत. या जप्त मालमत्तांची किंमत 11.86 कोटी रुपये असली तरीही बाजारमूल्य सुमारे 60-70 कोटी रुपये असल्याचा कयास आहे. 83 वर्षीय अब्दुल्ला यांची याप्रकरणी ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांची श्रीनगरमध्ये अखेरची चौकशी झाली होती. तर ईडीकडून करण्यात आलेली कारवाई राजकीय सूडापोटी करण्यात आल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे.









