प्रदेशाध्यक्षांना पत्रे लिहून व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डातील भंडारी समाजाच्या नेत्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. अलीकडील राजकीय घडामोडींत दत्तप्रसाद मांदेकर आणि वनिता मडकईकर यांनी अनुक्रमे प्राथमिक सदस्यत्वाचा आणि फातोर्डा भाजप गटाचा राजीनामा दिला आहे.
भाजपला फातोर्डात कोणतेही भवितव्य नसल्याचे सांगत भाजपचे नेते दत्तप्रसाद मांदेकर यांनी शक्ती केंद्र प्रमुखपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी आमदार दामोदर नाईक यांनी पक्षाचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात मांदेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना पत्र लिहिले आहे.
तर फातोर्डा येथील भाजपच्या ज्ये÷ कार्यकर्त्या वनिता मडकईकर यांनी फातोर्डा भाजप मंडळाचा आणि भाजपच्या गट अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. माजी आमदार दामोदर नाईक यांनी कार्यकर्त्यांबद्दल चुकीची वृत्ती दाखवली आहे. येत्या निवडणुकीत ते अनामत रक्कमही गमावू शकतात, असे मडकईकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अलीकडेच फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासोबत व्यासपीठावर सहभागी झालेल्या प्रमोद नाईक आणि भाजपच्या इतर सदस्यांना भाजप गटातील पदांवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर दामोदर नाईक यांच्यावर नाराज असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी फातोर्डात भाजपला संधी नसल्याचे दर्शवत हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक कारणांमुळे भाजपचे इतर कार्यकर्तेही आपल्या पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.









