प्रतिनिधी / सातारा :
शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांनी केलेल्या तक्रारींचा निकाल लगेच लागला पाहिजे. निपटारा झाला पाहिजे. कुठेही दिरंगाई होताना माझ्याकडे तक्रार आली, फाईल अडवल्याचे समजली तर मी कोणाला सोडणार नाही. सर्व विभागांनी आलेल्या तक्रारी, त्या तक्रारींवर काय कार्यवाही केली. कार्यवाही झाली नसेल तर तसे कारण मला एका महिन्यात द्या. कोणी आंदोलन केले तर 353 नुसार गुन्हा दाखल करता आणि सेवा हमी कायद्यानुसार एकही कारवाई होत नाही. छान कारभार चालला आहे, अशा शब्दात सर्वच अधिकाऱयांना फैलावर घेत मंत्री बच्चू कडू यांनी राज्यात पुणे जिल्हा हा प्रायोगिक तत्वावर भिकारीमुक्त जिल्हा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. विधवा महिला, निराधार महिला यांचा सर्व्हे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत करा, स्वयंसेवी संस्थामार्फत नको, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
मंत्री झाल्यानंतर बच्चू कडू यांचा साताऱयाचा हा पहिला दौरा होता. त्यांनी पाच जिह्यातील महिला बालकल्याण विभागाची बैठक सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, शिक्षण अधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आढावा घेताना अनाथाचे प्रमाणपत्र देतो का?, कितीजणांना दिले, अर्ज किती प्राप्त झाले, अशी विचारणा केली. बाल संगोपन योजना आहे त्याकरता निकष काय आहेत, लाभार्थी कोण आहे?, बाल संगोपन आणि महिला संगोपन योजना वेगवेगळी आहे?, किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला. एवढे कमी कसे?, सगळ्या अधिकाऱयांनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यामार्फत विधवा, निराधार महिलांचा सर्व्हे करुन घ्या. एका महिन्यात सगळीं आकडेवारी आली पाहिजे. त्यामध्ये शेतकरी मजूर महिलांचाही समावेश घ्या. 19 वर्षाच्या आतल्या विधवा महिलांची नोंद करा, कुठली संस्था सर्व्हेला घेवू नका, आशा वर्कर्संना मानधन कमी आहे, त्यांना हे काम करु द्या. हे काम करण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा घ्या. गरीब विधवा महिला असेल तर तिचा आणि मुलाचा फोटो घ्या, एकही लाभार्थी सुटता कामा नये. संजय गांधी निराधार योजनेचे एवढेच कमी लाभार्थी कसे?, एका महिन्याच्या आत शोधून झाले पाहिजेत.









