वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
फवाद आलमच्या नाबाद शतकाच्या जोरावर तसेच शाहीन आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीमुळे येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत पाकने मजबूत पकड मिळविली असून त्यांना या मालिकेत बरोबरी साधण्याची संधी मिळाली आहे. फवाद आलमने आपले पाचवे कसोटी शतक झळकविताना नाबाद 124 धावा जमविल्या.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विंडीजने पाकवर 1-0 अशी आघाडी मिळविताना पहिल्या सामन्यात पाकचा केवळ एका गडय़ाने पराभव केला होता. या दुसऱया कसोटीत पावसाचा अडथळा आल्याने दुसऱया दिवशीचा संपूर्ण खेळ वाया गेला. तत्पूर्वी पाकने पहिल्या दिवशी 4 बाद 212 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पाकने प्रारंभ केला आणि त्यांनी आपला पहिला डाव 9 बाद 302 धावांवर घोषित केला. फवाद आलमने 213 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 124 धावा जमविताना बाबर आझमसमवेत तिसऱया गडय़ासाठी 158 धावांची भागिदारी केली. कर्णधार बाबर आझमने 75 धावा जमविल्या. फवाद आलम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या गडय़ासाठी 50 धावांची भर घातली. मोहम्मद रिझवानने 31 धावा जमविल्या तर अश्रफने 26 धावांचे योगदान दिले व शाहीन आफ्रिदीने 19 धावा जमविल्या. विंडीजतर्फे रॉचने 68 धावांत 3, सील्सने 31 धावांत 3 तर होल्डरने 43 धावांत 2 गडी बाद केले.
रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी खराब हवामानामुळे सुमारे 90 मिनिटाचा खेळ वाया गेला. पाकचा डाव संपल्यानंतर विंडीजच्या पहिल्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. शाहीन आफ्रिदी आणि अश्रफच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजची दिवसअखेर स्थिती 18 षटकात 3 बाद 39 अशी केविलवाणी झाली. शाहीन आफ्रिदीने विंडीजचा सलामीचा फलंदाज पॉवेलला 5 धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने कर्णधार ब्रेथवेटचा 4 धावांवर त्रिफळा उडविल्यानंतर अश्रफने चेसला 10 धावांवर त्रिफळाचीत केले. बॉनेर 18 तर जोसेफ 0 धावांवर खेळत होते. विंडीजचा संघ 263 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत. पाकला मालिकेत बरोबरी करण्याची संधी लाभली आहे.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव 110 षटकांत 9 बाद 302 डाव घोषित (फवाद आलम नाबाद 124, बाबर आझम 75, रिझवान 31, अश्रफ 26, शाहीन आफ्रिदी 19, रॉच 3-68, सील्स 3-31, होल्डर 2-46), विंडीज प. डाव 18 षटकांत 3 बाद 39 (ब्रेथवेट 4, पॉवेल 5, बॉनेर खेळत आहे 18, चेस 10, शाहीन आफ्रिदी 2-13, अश्रफ 1-0).









