संगमेश्वर बाजारपेठेतील प्रकार
वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर बाजारपेठेत हातगाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून झालेल्या वादात फळविक्रेत्याने भर बाजारपेठेत चाकूचे वार केले. यात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. गणेशोत्सव खरेदीसाठी झालेल्या गर्दीवेळी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत योगेश भिंगार्डे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश आपल्या दुकानासमोर रत्नागिरी येथून आलेल्या मालाचा टेम्पोतून माल दुकानात उतरवून घेत होते. त्यावेळी दुकानासमोर असलेली फळगाडी बाजूला घेण्यास अतुल भिंगार्डे यांनी सांगितले. याचा राग आल्याने फळ विक्रेता केतन प्रसादे याने वाद घालत त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी योगेश त्याला समजवण्यास गेले असता त्यांच्या हातावर त्यांनी फळे कापायच्या चाकूने वार केला. त्यांना वाचवण्यासाठी कामगार अमित अनंत गुरव मध्ये पडला असता त्याच्या हातावरही निसटता वार त्याने केला.
या दोघांनाही किरकोळ दुखावत झाली आहे. केतन प्रसादे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









