11 वर्षीय मान्या हर्षाचा अनोखा उपक्रम, पर्यावरणावर आधारित 5 पुस्तकांचे लेखन
बहुतांश मुले स्मार्टफोन आणि व्हिडिओ गेम्समध्ये व्यस्त असताना बेंगळूरची मान्या हर्षाने फळभाज्यांच्या सालींपासून ईको सस्टेनेबल पेपर तयार केला आहे. पर्यावरण रक्षणाच्या मान्याच्या प्रयत्नांचे कौतुक युनायटेड नेशन्सकडून करण्यात आले आहे.
मी प्रत्येक दिवस वसुंधरा दिनासारखाच साजरा करते. पर्यावरणाचे रक्षण करणे आम्हा सर्वांची जबाबदारी असल्याचे ती सांगते. उन्हाळय़ांच्या सुटीमध्ये मान्याने कांद्याच्या सालींपासून ए-4 आकाराचा कागद तयार केला आहे. ती सुमारे 10 कांद्यांच्या सालींचा वापर करत 2 ते 4 ए-4 आकाराचे कागद तयार करते. पण कागद तयार करण्याचा तिचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. तरीही तिने वेगवेगळे कव्हर आणि पॅटर्नची शीट तयार करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला.
वसुंधरेचा विनाश होताना मी पाहू शकत नाही. वसुंधरा ही आमची माता असून तिची मुले म्हणून आम्ही तिचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्यच असल्याचे तिने म्हटल आहे. मान्याने निसर्गावर आधारित आतापर्यंत 5 पुस्तके लिहिली आहेत. आणखीन दोन पुस्तकांवर तिचे काम सुरू आहे. माझे कुटुंबच माझी प्रेरणा आहे. माझ्या पालकांनी मला सदैव पर्यावरण रक्षणाच्या दिशेने काम करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे तिने म्हटले आहे. आम्हाला आमच्या मुलीवर गर्व आहे. ती अत्यंत कमी वयापासून प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असायची. निसर्गाला वाचविण्यासाठी ती विविध प्रकारे प्रयत्न करते असे तिच्या आईने म्हटले आहे. मान्या हँडमेड पेपरपासून पेपर बॅग तयार करते आणि छोटय़ा दुकानांमध्ये त्यांचे वाटप करते.









