चालक व सहचालकाविरोधात तक्रार. कर्नाटक नोंदणीकृत गाडीतून बेकायदेशीरपणे भाजी विक्री. मयेचे उपसरपंच विश्वास चोडणकर यांनी पकडली गाडी.
डिचोली/प्रतिनिधी
फलोत्पादन महामंडळाच्या बनावट परमीटद्वारे गोव्यात बेकायदेशीररीत्या भाजीचा व्यवसाय करणाऱया कर्नाटक नोंदणीकृत गाडीसह चालक व सहचालकाला डिचोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मयेचे उपसरपंच विश्वास चोडणकर यांनी सदर केए 22 डी 3316 हि गाडी भाजीसह हळदणवाडी जंक्शनवर असताना चालकाची व सहचालकाची चौकशी करून सदर गाडीच्या परमीटची तपासणी केली असता तो परमीट बनावट असल्याचे निदर्शनास येताच डिचोली पोलिसांना संपर्क करून गाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
दरम्यान या प्रकरणी फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी डिचोली पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे डिचोली पोलिसांनी या बेकायदेशीर प्रकरणात गुंतलेली गाडी व चालक, सहचालकाला अटक केली आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, केए 22 डी 3316 हि भाजी घेऊन येणारी मिनी टेंपो मंगळ. दि. 21 एप्रिल रोजी संध्या. 5.45 वा. केरी सत्तरी चेकनाका पार करून गोव्यात प्रवेश झाली होती. त्याच दिवशी रात्री 11 वा. च्या सुमारास हळदणवाडी मये येथील जंक्शनवर पैरा येथून सदर गाडी दाखल झाली होती. डिचोलीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना याठिकाणी दाखल झालेल्या मयेचे उपसरपंच विश्वास चोडणकर यांनी सदर गाडीची संशयावरून चौकशी केली. यावेळी चालक व सहचालकाने दिलेल्या माहितीत तफावत आढळल्याने त्यांनी त्यांची सखोल चौकशी करताना गाडीवरील परमीटाचीही सविस्तरपणे पाहणी केली. या पाहणीत सदर परमीट बनावट असल्याचे निदर्शनास आले.
डिचोली पोलिसांना माहिती व गाडी ताब्यात.
सदर गाडीबाबत चौकशीत तफावत व गाडीवरील परमीट बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर उपसरपंच विश्वास चोडणकर यांनी डिचोली पोलीस स्थानकात संपर्क साधून माहिती दिली. डिचोली पोलिसांनी सदर गाडी व चालक महम्मद अशम चिकोडी (वय 26, रा. बेळगाव) व सहचालक हुसेन बशीर बामनी ( वय 30, रा. बेळगाव) यांना ताब्यात घेतले. नंतर डिचोली पोलिसांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांना रात्रीच संपर्क साधून या प्रकाराबाबत माहिती दिली असता त्यांंनी दुसऱया दिवशी सकाळी येऊन आपण सदर गाडीची शाहनिशा करणार असल्याचे सांगितले.
वाहनावर झेरॉक्स मारलेला आणि माहिती बदललेला परमीट
सदर कर्नाटक नोंदणीकृत अशोक लेयलंड वाहनावर लावण्यात आलेला परमीट हा झेरॉक्स मारून हाताने माहिती बदलेल्या अवस्थेत होता. या गाडीवरील परमीटच्यानुसार सदर परमीट हा महेश नित्तुरकर या अधिकृत भाजी पुरवठा करणाऱया भाजी व्यवसायिकाला त्याच्या जीए 09 यु 5286 या गाडीवर रमीझ शेख या चालकासाठी एसजी 1 या रूटसाठी तर दुसरी गाडी क्र. जीए 05 टी 3140 या गाडीवर फकीरप्पा कुरी या चालकाला एसजी 17 या रूटसाठी देण्यात आला होता. मात्र सदर परमीटची झेरॉक्स प्रत काढून परमीटवरील गाडीच्या क्रमांक कॉलममध्ये परमीटवरील मूळ गाडीचा क्रमांक लपवून त्यावर केए 22 डी 3316 हा क्रमांक हाताने लिहिण्यात आला होता. यावरून सदर परमीट हा बनावट असून ताब्यात घेतलेले व्यक्ती हे बेकायदेशीरपणे फलोत्पादन महामंडळाच्या नावावर भाजीचा व्यवसाय गोव्यात करीत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.
30 मार्चपासून नव्याने परमीट देण्यात आले होते.
राज्यात लॉकडाउन लागू झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये भाजीची मोठय़ा प्रमाणात कमतरता जाणवू लागली होती. तसेच खासगी भाजीवाले अव्वाच्या सव्वा दराने भाजीची विक्री करीत असल्याने गोवेकरांना बराच आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. त्यासाठी फलोत्पादन महामंडळाने गोवेकरांना भाजीची पुरवण समाधानकारक दराने करण्यास सुरू केली होती. त्यावेळी 30 मार्च रोजी फलोत्पादन महामंडळाने आपल्या सर्व अधिकृत भाजी पुरवठादारांना या लॉकडाउन काळात म्हणून विशेष परमीट दिला होता. सदर परमीटची मूळ प्रत (ओरीजनल) सर्व गाडय़ांच्या दर्शनी आरशाला चिकटविणे बंधनकारक केले होते. कोणत्याही गाडीला झेरॉक्स प्रत लावण्याची अनुमती महामंडळाने दिली नव्हती. त्यानुसार सदर मूळ परमीट धारकांनाच गोव्यातील फलोत्पादन महामंडळाच्या गाळय़ांवर भाजी पुरविण्याची परवानगी आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बनावट परमीट लावलेली गाडी गाडी चेकनाक्मयावरून सुटणे आश्चर्यकारक.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे राज्याच्या सर्व सीमा सील करण्यात आलेल्या असल्याने केवळ अत्यावश्यक गोष्टीच्या गाडय़ा सोडल्यास इतर कोणत्याही गाडय़ा चेकनाक्मयावरून गोवा सीमेच्या आत येऊ शकत नाही. तसेच या चेकनाक्मयावर सर्व गाडय़ांची कुसून तपासणी करणे आवश्यक करण्यात आले असतानाही केरी चेकनाक्मयावरून अशा प्रकारे बनावट परमीट लावून आलेली भाजीची गाडी सुटणे आणि त्या गाडीच्या मार्फत गोव्यात भाजीचा बेकायदेशीर व्यवसाय होणे, हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटत आहे. सदर गाडीवर गोवा राज्य सरकारच्या फलोत्पादन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीनिशी परमीट असल्याने कदाचित सदर गाडीची सखोल चौकशी केली गेली नसावी. मात्र अशा प्रकारे कितीतरी भाजीच्या गाडय़ा बनावट परमीटचा आधार घेऊन गोव्यात प्रवेश करीत असणार व बेकायदेशीर व्यवसाय करून गोवेकरांना लुटत असणार, याची सखोल चौकशी होणे तसेच गोव्यात प्रवेश करणाऱया प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करणे गरजेचे आहे.
फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी या प्रकरणी रितसर तक्रार डिचोली पोलीस स्थानकात नोंदविल्यानंतर पोलिसांनी सदर कर्नाटक सरकार नोंदणीकृत गाडी जप्त केली. व गाडीचा चालक महम्मद अशम चिकोडी व सहचालक हुसेन बशीर बामनी यांना अटक केली.









