प्रतिनिधी / नागठाणे :
हर्णे बंदर (रत्नागिरी) येथे फिरावयास गेलेल्या फत्यापूर (ता.सातारा) येथील युवकांच्या जीपला झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य सात जण जखमी झाले. पंकज भगवान घाडगे (वय ३९.) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.
फत्यापुर येथील आठ युवक क्रुजर जीप घेऊन हर्णे बंदर येथे गेले होते. रविवारी सायंकाळी तेथून पुन्हा परत साताऱ्याकडे येत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील खावटी गावच्या विणेरे फाटा हद्दीत त्यांच्या जीपचा पुढील टायर फुटल्याने जीप महामार्गालगतच्या ओढ्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात डोक्याला मार लागून पंकज घाडगे हा युवक गंभीर जखमी झाला. तर किरण मनोहर घाडगे याचा उजवा हात फ्रॅक्चर झाल्याने जखमी झाला. जीपमधील राहुल सुदाम घाडगे,आकाश दत्तात्रेय काळंगे,सचिन शिवाजी घाडगे,उदय सुधाकर घाडगे,गणेश देशमुख व विनोद शंकर घाडगे (सर्व रा .फत्यापुर,ता.सातारा) हे किरकोळ जखमी झाले.
या सर्वांना कळंबणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यावेळी उपचारादरम्यान पंकज घाडगे याचा मृत्यू झाला.









