‘फ्री काश्मीर’वरील टीकेला जयंत पाटील यांचे उत्तर
फ्री काश्मीर म्हणजे केंद्राचे नियंत्रण नसणे
मुंबई / प्रतिनिधी
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ झालेल्या निदर्शनात झळकावण्यात आलेल्या ‘फ्री काश्मीर’च्या फलकावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात मंगळवारी ट्विट युध्द रंगले.
मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर निदर्शने होत असताना ‘फ्री काश्मीर’चे फलक झळकवण्यात आले. आंदोलनाचे समर्थन करणाऱया पक्षांनी ‘फ्री काश्मीर’चे उत्तर द्यावे. सरकार हे कसे खपवून घेते? असा सवाल फडणवीस यांनी ट्विटरद्वारे केला होता.
फडणवीस यांच्या ट्विटला जयंत पाटील यांनी ट्विटरवर करून उत्तर दिले. ‘फ्री काश्मीर’ म्हणजे सर्व प्रकारचा भेदभाव, मोबाईल बंदी, केंद्राचे नियंत्रण आदी सर्वच बाबतीत काश्मीर मोकळा हवा, असा त्याचा अर्थ आहे. तुमच्यासारखा जबाबदार नेता द्वेषयुक्त अर्थ लावून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, यावर विश्वास बसत नाही. सत्ता गेल्यामुळे असे होत आहे की स्वनियंत्रण गेल्याचा हा परिणाम आहे ? असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे.
पाटील यांच्या या प्रश्नाला फडणवीस यांनी ट्विट करून उत्तर दिले. आता फुटीरतावादी लोकांना सरकारचा वकील मिळतो. जयंतराव तुमच्याकडून मतांचे राजकारण अपेक्षित नाही. काश्मीरला यापूर्वीच भेदभाव मुक्त करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिथे काही निर्बंध आहेत. आम्ही सरकारमध्ये असो वा विरोधी पक्षात, आमच्यासाठी राष्ट्र प्रथम हेच तत्त्व असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.









