डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान 21 धावांनी विजयी : विजयासह उपांत्य फेरीच्या आशा कायम तर किवीज संघाची वाट बिकट
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर दोनवेळा पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयाचा हिरो फखर झमन ठरला. झमनने केवळ 81 चेंडूत 126 धावांची ऐतिहासिक खेळी साकारत विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह पाकिस्तानने अफगाणिस्तानला मागे टाकत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. सलग चार पराभवामुळे किवीज संघाचा सेमीफायनलचा प्रवास मात्र बिकट झाला आहे.

प्रारंभी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 401 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केली. पावसाचे वातावरण असल्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांनी आधीच धावगती जास्त राखली, ज्याचा फायदा त्यांना डीएलएस नियमानुसार पुढे झाला. पाकनेही जोरदार सुरुवात करताना 21.3 षटकांत 1 बाद 160 धावा केल्या. यादरम्यान, मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला. यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकचा संघ 10 धावांनी पुढे होता. यानंतर पाकला 41 षटकांत 342 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले आणि त्यांना 117 चेंडूत 182 धावा करायच्या होत्या. खेळाला सुरुवात झाल्यानंतर फखर झमन व बाबर आझम यांनी आपली फटकेबाजी सुरु ठेवताना डीएलएस नियमानुसार पाकला धावसंख्येनुसार पुढे ठेवले. 25.3 षटकांत 1 बाद 200 धावांवर पुन्हा पाऊस सुरु झाला. यावेळी पाकचा संघ 21 धावांनी पुढे होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
फखर झमन ठरला विजयाचा हिरो
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पाक सलामीवीर अब्दुलाह शफीक 4 धावा काढून बाद झाला. यानंतर सलामीवीर फखर झमन आणि बाबर आझम यांनी मिळून अशी खेळी खेळायला सुरुवात केली, ज्याचे उत्तर कोणत्याही किवी गोलंदाजाकडे नव्हते. फखरने अवघ्या 81 चेंडूत 126 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने 11 षटकार आणि 8 चौकार मारले. कर्णधार बाबर आझमनेही 63 चेंडूंचा सामना करत नाबाद 66 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. बाबर आणि फखर यांच्यात 194 धावांची नाबाद भागीदारी झाली.
400 धावा करुनही न्यूझीलंड पराभूत
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या न्यूझीलंड संघाला डेवॉन कॉनवे व रचिन रवींद्र यांनी 68 धावांची शानदार सलामी दिली. मैदानात स्थिरावलेल्या या जोडीला हसन अलीने धक्का दिला. कॉनवेला 35 धावांवर बाद करत त्याने पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. यानंतर कर्णधार केन विल्यम्सन मैदानात उतरला. अंगठ्याच्या दुखापतीने त्रस्त असताना देखील त्याने सुरुवातीपासून आक्रमण करत पाकिस्तानला दबावाखाली ठेवले. दुसऱ्या बाजूने रचिन रविंद्रने आपला शानदार फॉर्म कायम राखताना पाकच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी एकापाठोपाठ 50 धावांचा टप्पा पार केल्यानंतर आपापल्या शतकांच्या दिशेने मार्गक्रमण केले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 180 धावांची भागीदारी साकारत संघाला पावणेतीनशेचा टप्पा गाठून दिला. दरम्यान, शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या विल्यम्सनला मोहम्मद वासीमने बाद करत ही जोडी फोडली. विल्यम्सनने 79 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह 95 धावा केल्या. रचिनने मात्र या विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले. एकाच विश्वचषकात तीन शतके झळकावणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला. त्याने 94 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह 108 धावा फटकावल्या. शतकानंतर मात्र तो लगेचच बाद झाला. यानंतर डॅरिल मिचेलने 18 चेंडूत 29 धावा, मार्क चॅपमनने 27 चेंडूत 39 धावा, ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत 41 धावा करून न्यूझीलंडला 400 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. शेवटी मिचेल सँटनरने 17 चेंडूत 26 धावा करून नाबाद राहिला आणि टॉम लॅथम 2 धावांवर नाबाद राहिला. यामुळे किवीज संघाला 50 षटकांत 6 बाद 401 धावांचा डोंगर उभा करता आला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 50 षटकांत 6 बाद 401 (कॉनवे 35, रचिन रविंद्र 108, केन विल्यम्सन 95, डॅरेल मिचेल 29, सँटेनर नाबाद 26, ग्लेन फिलिप्स 41, चॅपमन 39, मोहम्मद वासीम 60 धावांत 3 बळी).
पाकिस्तान 25.3 षटकांत 1 बाद 200 (अब्दुल्ला शफीक 4, फखर झमन नाबाद 126, बाबर आझम नाबाद 66, टीम साऊदी 27 धावांत 1 बळी).
रचिन रविंद्रची डेब्यू वर्ल्डकपमध्ये तीन शतके

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रविंद्रने पाक गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करताना शतक झळकावले. विशेष म्हणजे, कारकिर्दीतील पहिलाच वर्ल्डकप खेळणाऱ्या रविंद्रचे हे यंदाच्या वर्ल्डकपमधील तिसरे शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतके झळकावली होती. रचिन हा पदार्पणाच्या वर्ल्डकपमध्ये 3 शतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वर्ल्डकपच्या 48 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. तसेच तो न्यूझीलंडकडून एका वर्ल्डकप स्पर्धेत तीन शतके करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
फखर झमनची तुफानी फलंदाजी
बेंगळूर येथील लढतीत सुरुवातीला न्यूझीलंडने 6 बाद 401 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर पाकनेही दमदार सुरुवात करताना किवीज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यामध्ये सलामीवीर फखर झमनने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले. पाकिस्तानसाठी हे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक देखील ठरले. फखर झमनच्या आधी हा विक्रम इम्रान नझीरच्या नावावर होता. इम्रान नजीरने 2007 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 95 चेंडूत शतक झळकावले होते. मात्र, झमनने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकत नझीरचा हा विक्रम मोडला.
पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा कायम तर किवीज संघ संकटात
न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी 8 गुण आहेत, परंतु न्यूझीलंड चांगल्या नेट-रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा आता प्रत्येकी एक सामना बाकी आहे, तर अफगाणिस्तानला दोन सामने खेळायचे आहेत. पाकिस्तानच्या या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघही उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पराभवामुळे किवीज संघाची वाटचाल मात्र चांगलीच बिकट झाली आहे.









