मालवणचा तीव्र विरोध : कणकवलीची साफ पाठ : सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ल्याची सुनावणी स्थगित : मोठा पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी / मालवण:
मालवण पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या सीआरझेडच्या ऑफलाईन जनसुनावणीकडे कणकवली तालुक्याने साफ पाठ फिरविली. देवगड तालुक्याची सुनावणी मात्र निर्धारित वेळेत पूर्ण झाली. तर मालवणवासीयांनी ऑनलाईनप्रमाणे ऑफलाईन जनसुनावणीलाही तीव्र विरोध दर्शवित खुल्या मैदानात जनसुनावणी घेण्याची मागणी केली. त्यामुळे मालवण आणि कणकवली तालुक्याची जनसुनावणी होऊ शकली नाही.
मालवणवासीयांनी मोठय़ा संख्येने पंचायत समितीमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तंग बनले होते. सभागृहाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. कडक पोलीस बंदोबस्तासह दंगा काबू पथकही तैनात ठेवण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱयांचे प्रतिनिधी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑफलाईन सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे रुपेश महाले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी गायकवाड, पर्यावरण विभागाचे सोनटक्के, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, मालवण तहसीलदार अजय पाटणे, देवगड महसूल नायब तहसीलदार जी. के. सावंत, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण तसेच इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मालवणवासीयांनी नोंदविला तीव्र आक्षेप
ऑनलाईन जनसुनावणीला विरोध झाल्यानंतर दुसऱया दिवशीच ऑफलाईन जनसुनावणी घेण्याची घाई कशाला? जनतेच्या हितासाठी खुल्या मैदानात जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. ज्या अधिकाऱयांनी हा आराखडा बनविला, ते अधिकारी उपस्थित नसताना जनसुनावणीस अर्थ काय राहणार? ज्यांनी लेखी स्वरुपात हरकती नोंदविलेल्या आहेत, त्यांना जनसुनावणीची नोटीस देण्यात आली आहे काय? असे प्रश्न उपस्थित करीत जनसुनावणी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अशोक सावंत, तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर, धोंडी चिंदरकर, छोटू सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, हरी खोबरेकर, विलास हडकर, तुकाराम कांदळकर यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, स्नेहा केरकर, अवि सामंत, डॉ. जितेंद्र केरकर, शिला गिरकर, महेंद्र पराडकर, महेश मांजरेकर, मिलींद झाड, पूजा सरकारे, ममता वराडकर, भाऊ सामंत, अविनाश सामंत, महेश जावकर, आप्पा चव्हाण, राकेश कुंटे, डॉ. चंद्रशेखर परब, ऍड. समीर गवाणकर, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, एस. के. वायंगणकर, मिलींद झाड, विष्णू मेस्त्राr, सतीश खोत, रवींद्र खानविलकर, सागर चव्हाण, ज्ञानेश्वर सादये, शरद माडये, दीपक कुडाळकर, दशरथ कवटकर, विठ्ठल कवटकर, प्रदीप आचरेकर, तुळशीदास कोयंडे, राहुल कोयंडे, घन:श्याम कुबल, राजन कुमठेकर, दत्तात्रय पडवळ, शंकर मेस्त्राr, संजय नाटळकर, अभय पाटकर, गणेश माडये, दर्शन वेंगुर्लेकर, साईनाथ माडये, मंदार गोवेकर तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
देवगडची सुनावणी पूर्ण : उपस्थितांनी नोंदविल्या हरकती
देवगड तालुक्याची दुपारी तीन वाजता सुनावणी सुरू करण्यात आली. देवगड सभापती सुनील पारकर यांनी उपस्थित देवगडवासीयांच्यावतीने एकत्रितपणे जनसुनावणीत सहभागी होताना हरकत नोंदविली. त्यांनी सांगितले, देवगड तालुक्यातील समुद्र किनाऱयाकडील नऊ गावे व खाडी किनाऱयाकडील 18 गावे ही सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापनामध्ये दिसत आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे व आमचे मच्छीमार बांधव यांची घरे पिढय़ान्पिढय़ा समुद्रकिनारी वसलेली असून त्यांना या कायद्याची कोणतीही कल्पना व बदल झालेला माहिती नसून किंवा आराखडय़ाची कल्पना दिलेली नसून ही जनसुनावणी त्या-त्या तालुक्यात होऊन लोकांना विश्वासात घेऊन करण्यात यावी. प्रत्येक गावातील किती मीटर क्षेत्र सीआरझेडमध्ये येणार आहे, याची कल्पना त्या गावातील लोकांना देण्यात यावा व त्याचे मार्किंग करण्यात यावे. त्या-त्या गावातील सक्षम प्राधिकाऱयांना बांधकाम मंजुरीचे अधिकार देण्यात यावेत. विजयदुर्ग येथील एका बाजूला खाडी व दुसऱया बाजूला समुद्र असून संपूर्ण गाव सीआरझेड क्षेत्रात बाधित होत असून गावाच्या इतिहासात आजपर्यंत उधाणाच्या भरतीमुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान आजतागायत झाले नाही. तरी सदर गाव अधिनियमातून वगळावे. मिठमुंबरी बागवाडी समुद्र व खाडीने वेढलेले असून सदर वाडी सदर अधिनियमातून वगळावी. rतिर्लोट गाव पूर्णपणे सीआरझेड बाधित क्षेत्रात येत असून सदर अधिनियमातून सूट देण्यात यावी. सदर आराखडय़ातील सर्व तरतुदी स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन विस्तृतपणे समजावून सांगाव्यात. यावेळी चर्चेत रामकृष्ण जुवाटकर, रमेश तारी, लक्ष्मण तारी, धर्माजी आडकर, संजय पराडकर यांनी सहभाग घेतला होता.
कणकवली तालुक्याची पाठ
दुपारी दोन वाजता कणकवली तालुक्याची सुनावणी सुरू करण्यात आली. यावेळी कणकवली तालुक्यातून एकही व्यक्ती जनसुनावणीसाठी उपस्थित राहिली नव्हती. मात्र कणकवलीतून यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या हरकतींची दखल घेत संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ज्यांना लेखी हरकत घ्यायची नसेल, ते सुनावणीस उपस्थित राहून आपली हरकत नोंदवू शकतात, असे यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. काही हरकती असल्यास बुधवारी, दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येऊ शकतात, असेही यावेळी सांगण्यात आले.
पत्र देत सभागृह सोडले
मालवण पंचायत समितीमध्ये चार ते पाच या वेळेत घेण्यात येणाऱया व चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या जनसुनावणीस आम्हा सर्वांची हरकत असून जोपर्यंत जनतेस आवश्यक सक्षम अधिकारी उपलब्ध होत नाही तसेच उपस्थित लोकांना बसण्यासाठी आवश्यक ती जागा व आसन व्यवस्था प्रशासन उपलब्ध करून दिली जात नाही तसेच लेखी सादर केलेल्या हरकतींचे निरसन होत नाही, तोपर्यंत ही जनसुनावणी स्थगित करावी, असे पत्र देत मालवणवासीयांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.









