ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 44 जागांसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या मतदान प्रक्रियेवेळी कूच बेहर जिल्ह्यातील सितालकुची भागातील दोन मतदान केंद्रांवर झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सितालकुची येथील एका मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केला. यात आनंदचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर दुपारी सितालकुचीमधीलच 126 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर अज्ञातांनी गोळीबार केला. यात 4 जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही गर्दी हटवली.









