ऑनलाईन टीम / कोलकाता :
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. उद्यापासून प. बंगालमधील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, स्पा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, प्राणिसंग्रहालये बंद राहतील. राज्याचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
द्विवेदी म्हणाले, राज्यातील कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता सरकारने रविवारी नवीन निर्बंध जाहीर केले. बंगालमध्ये उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, मॉल्स, स्पा, सलून, ब्यटी पार्लर, प्राणिसंग्रहालये, चित्रपटगृह, पर्यटन स्थळे बंद राहतील. तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने कार्यरत असतील. सर्व प्रशासकीय बैठका व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात येतील. 5 जानेवारीपासून मुंबई आणि दिल्लीहून आठवडय़ातून (सोमवार आणि शुक्रवार) फक्त दोन दिवस उड्डाणे चालतील.
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी 4 हजार 512 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 13 हजार 300 एवढी आहे.