वृत्त संस्था/ इंडियन वेल्स
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए आणि एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला टेनिसपटू कॅरोलिना प्लिस्कोव्हा, विद्यमान विजेती बिनाका अँड्रेस्क्यू आणि पुरूष विभागात ओपेल्का यांचे आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या तिसऱया फेरीतील झालेल्या सामन्यात ब्राझीलच्या बेट्रीझ हॅडेड माईयाने टॉप सीडेड प्लिसकोव्हाचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यात बेट्रीझने आठवेळा प्लिसकोव्हाची सर्व्हिस तोडली. प्लिस्कोव्हाकडून 12 दुहेरी चुका नोंदविल्या गेल्या. आता ब्राझीलच्या बेट्रीझ माईयाचा पुढील फेरीतील सामना इस्टोनियाच्या कोंटाव्हेटशी होणार आहे. इस्टोनियाच्या कोंटाव्हेटने विद्यमान विजेती अँड्रेस्क्यूचा 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला. जर्मनीच्या केर्बरने डेरिया कॅसेटकिनाचा 6-2, 1-6, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
पुरूषांच्या विभागात बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने अमेरिकेच्या ओपेल्काचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. डिमिट्रोव्हचा पुढील फेरीतील सामना रशियाच्या मेदव्हेदेव किंवा क्रेजिनोव्हिक यांच्याविरुद्ध होईल. तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात श्वार्त्झमनने ब्रिटनच्या इव्हान्सचा 5-7, 6-4, 6-0 असा पराभव केला.









