वृत्तसंस्था/ दुबई
अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने सलग दुसऱया आठवडय़ात कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का दिला असून पेगुलाने झेकच्या सहाव्या मानांकित प्लिस्कोव्हाचा 6-0, 6-2 असा धुव्वा उडवित दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मागील आठवडय़ातही कतार ओपनमध्ये पेगुलाने तिला हरविले होते.
पेगुलाने केवळ 53 मिनिटांच्या खेळात प्लिस्कोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. तिची पुढील लढत कॅरोलिन गार्सिया किंवा एलिस मर्टेन्स यापैकी एकीशी होईल. अन्य सामन्यात झेकच्या बार्बरा क्रेसिकोव्हाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाचा 6-3, 6-2 असा पराभव केला. स्वेतलानाने मंगळवारी अग्रमानांकित एलिना स्विटोलिनाला 2-6, 6-4, 6-1 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली होती. पण हा जोम तिला टिकविता आला नाही.
पेत्रा क्विटोव्हाची माघार
झेकच्या चौथ्या मानांकित पेत्रा क्विटोव्हाने मांडीला झालेल्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. दुसऱया फेरीत स्विसच्या जिल टीचमनविरुद्ध खेळताना दुसऱया सेटवेळी तिने माघार घेतली. त्यावेळी टीचमनने पहिला सेट 6-2 असा जिंकला होता तर दुसऱया सेटमध्ये क्विटोव्हा 4-3 असे पुढे होती. याआधी या स्पर्धेतून सिमोना हॅलेप, ऍश्ले बार्टी यांनीही माघार घेतली होती.









