कारवाईचा केवळ फार्स : महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेने प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले होते. पण अलीकडे प्लास्टिक बंदी मोहिमेकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याने प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. पुन्हा प्लास्टिक प्रदूषणात वाढ झाली असल्याने प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नसल्याने प्लास्टिक पिशव्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे राज्यशासन आणि महापालिकेने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले होते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. प्लास्टिकबंदी मोहिमेंतर्गत शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई केली होती. विपेत्यांकडील प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला. मात्र, अलीकडे या मोहिमेकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. वापरण्यात येणाऱया प्लास्टिक पिशव्या गटारीत टाकण्यात येत असल्याने सांडपाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. काळय़ा रंगाच्या पिशव्या तयार करण्यासाठी ऑईलच्या पिशव्यांचा वापर केला जातो. यामुळे अशा प्लास्टिकच्या पिशव्यांमधून खाद्यपदार्थ नेण्यास केंद्र शासनाने बंदी घातली आहे. मात्र, याचे उल्लंघन करून काळय़ा रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर फळ विक्रेते मोठय़ा प्रमाणात करीत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पण याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याने फळ विक्रेते काळय़ा रंगाच्या पिशव्यांचा वापर करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. अलीकडे प्लास्टिक बंदी मोहीम बारगळली असल्याने महापालिकेच्या अधिकाऱयांमध्ये आणि प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये समेट झाला आहे का, असा सवाल नागरिक करीत आहेत.









