जप्त केलेले प्लास्टिक पुन्हा दुकानात, कारवाईवेळी झाला गोंधळ
प्रतिनिधी/ बेळगाव
प्लास्टिक बंदीची कारवाई काटेकोरपणे करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. याअंतर्गत शुक्रवारी रविवार पेठेतील महादेव पॉली दुकानावर धाड टाकून प्लास्टिक जप्त करण्यात आले. पण यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करून मनपा वाहनात भरलेले प्लास्टिक पुन्हा दुकानात ठेवून टाळे लावले. यामुळे गोंधळ झाला, अखेर पोलीस संरक्षण घेवून दुकानामधील प्लास्टिक जप्त करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी विविध दुकानांमध्ये प्लास्टिक जप्तीसाठी कारवाई करून 82 हजार रुपयांचा दंड एका दिवसात वसूल करण्यात आला होता. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी रविवारपेठेतील तीन दुकानांवर धाड टाकून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा साठा जप्त केला. प्लास्टिक बंदी असूनदेखील मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा साठा करून विक्री करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आले. यामुळे थेट प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. रविवारपेठेतील महादेव पॉली या दुकानातील प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आले.
यावेळी नागरिक व आजुबाजूच्या दुकानदारांनी कारवाईस विरोध केला. कुरकुरे पाकिटे व अन्य पॅंिकंग पिशव्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच प्लास्टिक उत्पादन करणाऱया कंपन्यांना प्रथम टाळे ठोका, अशी मागणी करीत महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांशी हुज्जत घालून जप्त करून मनपाच्या वाहनात भरण्यात आलेले प्लास्टिक साहित्य पुन्हा दुकानात ठेवून टाळे लावण्यात आले. यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादावादी झाल्याने गोंधळ झाला. अखेर मनपाच्या पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधून पोलीस संरक्षण घेवून प्लास्टिक जप्तीची कारवाई पूर्ण केली. यावेळी दुकानातील प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत 460 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच 43 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते आर. व्ही. चित्तवाडगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते अदिल खान पठाण, प्रविण किलारी, महादेवम्मा, स्वच्छता निरीक्षक आदीसह अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.









